महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचेही आज `चलो दिल्ली` ! किसान सभेचे नेतृत्त्व - Even farmers in Maharashtra today 'Let's go to Delhi'! Leadership of Kisan Sabha | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचेही आज `चलो दिल्ली` ! किसान सभेचे नेतृत्त्व

शांताराम काळे
सोमवार, 21 डिसेंबर 2020

शेतकऱ्यांना किमान आधार भावाचे संरक्षण मिळावे व केंद्रीय स्तरावर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी, यासाठी राज्यसभेत खासदार के. के. रागेश यांनी खासगी विधेयके मांडून देशभरातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संसदेत रान उठविले होते.

अकोले : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून किसान सभेच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी आज (ता. 21) दिल्लीकडे कूच करणार आहेत. नाशिक येथून किसान सभेच्या नेतृत्वाखाली सुरू होणाऱ्या या वाहन मोर्चात महाराष्ट्रभरातील 21 जिल्ह्यांमधून हजारो शेतकरी सहभागी होत आहेत. राज्यभरातील हे शेतकरी नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथे एकत्र येतील. 

अखिल भारतीय किसान सभेचे नेते डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, किसन गुजर, डॉ. अजित नवले, सुनील मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या वाहन जथ्याला शुभेच्छा देण्यासाठी केरळचे खासदार आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव के. के. रागेश यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

शेतकऱ्यांना किमान आधार भावाचे संरक्षण मिळावे व केंद्रीय स्तरावर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी, यासाठी राज्यसभेत खासदार के. के. रागेश यांनी खासगी विधेयके मांडून देशभरातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संसदेत रान उठविले होते. आताच्या तिन्ही शेतकरीविरोधी आणि जनताविरोधी कायद्यांना राज्यसभेत त्यांनी कसून विरोध केला होता. दिल्ली येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून निघणाऱ्या शेतकऱ्यांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी के. के. रागेश उद्या नाशिक येथे येत आहेत. 

माकपचे राज्य सचिव नरसय्या आडम, आमदार जयंत पाटील, कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे राज्याचे निमंत्रक विश्वास उटगी, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, सीटूचे राज्य सचिव आमदार विनोद निकोले, भाकपचे नेते राजू देसले यांच्यासह अनेक मान्यवर शेतकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहतील.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून दुपारी 1 वाजता गोल्फ क्लब मैदानावर होणाऱ्या जाहीर सभेनंतर हा वाहन मोर्चा दिल्लीकडे कूच करेल.

शेकडो वाहने असलेला हा वाहन मोर्चा मुंबई-आग्रा महामार्गाने ओझर, पिंपळगाव बसवंत, शिरवाडे (वणी) मार्गे सायंकाळी 5-30 वाजता चांदवड येथे मुक्कामी पोहचेल. दुसऱ्या दिवशी 22 डिसेंबर रोजी सकाळी 8-00 वा चांदवड येथून वाहन मोर्चा पुन्हा सुरू होऊन उमराणे, मालेगाव, धुळे, शिरपूर मार्गे मध्य प्रदेशात मार्गस्थ होईल. या सर्व ठिकाणी जनातेतर्फे त्याचे जंगी स्वागत केले जाईल. मध्य प्रदेश, राजस्थान मार्गे 24 डिसेंबर रोजी तो दिल्ली येथे पोहचेल.

शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घ्यावेत, प्रस्तावित वीज विधेयक रद्द करावे, या मागण्याबरोबरच शेतकऱ्यांना आधार भावाचे कायदेशीर संरक्षण देणारा कायदा करावा व सरकारने आधार भावाने शेतीमाल खरेदी करण्याची सक्षम व्यवस्था उभी करून अन्नदात्याला घामाचे रास्त दाम व भुकेलेल्याला रास्त दरात अन्न देण्याची कायदेशीर व्यवस्था उभी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा वाहन मोर्चा काढण्यात येत आहे.

नगर जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. अशोक ढवळे, जे.पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, सुनील मालुसरे, डॉ. अजित नवले आदींनी केले आहे.

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख