राळेगणसिद्धी : "कॉंग्रेसचे सरकार असताना मी दिल्लीत उपोषण केले, तेव्हा भाजप नेते माझ्या आंदोलनाचे कौतुक करीत होते. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही, त्याचे उत्तरही दिले जात नाही. आंदोलनाला रामलीला मैदान नाकारले जाते. त्यामुळे भाजप नेत्यांचे शेतकऱ्यांच्या भूमिकेबाबत व कौतुकाचे व्हिडिओ जनतेला दाखविणार आहे,'' अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली.
स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालाला हमीभाव मिळावा, केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता मिळावी, या मागण्यांसाठी महात्मा गांधी पुण्यतिथीपासून (ता. 30) राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरात हजारे यांनी उपोषण आंदोलनाचा इशारा दिला आहे.
हजारे म्हणाले, "सन 2011मध्ये रामलीला मैदानावर आंदोलन करताना, सध्याच्या पंतप्रधानांपासून अनेक जण माझ्या आंदोलनाचे गुणगान गात होते. आता शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक वेळा पत्रव्यवहार केला. मात्र, त्यांच्याकडून एकाही पत्राचे उत्तर आलेले नाही. नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलनासाठी चार वेळा पत्रव्यवहार केला, तरीही परवानगी नाकारली.''
हेही वाचा..
मराठी भाषेबाबत जागरूकता हवी : प्रवीण मोदी
राहाता : "आपल्या देशातील विविध प्रांत व नागरिक आपापल्या भाषांचा वापर करण्याबाबत जागरूक असतात. आपणही मराठी भाषेबाबत ही जागरूकता दाखवायला हवी. याबाबत जागृती व्हावी, या हेतूने मराठी भाषासंवर्धन पंधरवड्याचे आयोजन केले जाते,'' असे प्रतिपादन वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश प्रवीण मोदी यांनी केले.
राहाता वकील संघ व तालुका विधी सेवा समितीतर्फे येथील न्यायालयात मराठी भाषासंवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते.
न्यायाधीश मोदी म्हणाले, ""जगाच्या पाठीवर जर्मनीसारखे काही प्रगत देश व्यवहारात जर्मन भाषेचाच वापर करतात. महाराष्ट्रात न्यायालयीन कामकाज मराठी भाषेत चालविण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी न्यायालयीन कामकाजातील इंग्रजी शब्दांना मराठीतील प्रतिशब्द शोधावे लागतात.''
Edited By - Murlidhar Karale

