या मंत्र्यांच्या तालुक्यात वाळुतस्करांविरुद्ध नदीपात्रात झोपून पर्यावरणप्रेमींचे आंदोलन - Environmentalists 'agitation against sand smugglers in these ministers' talukas | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

या मंत्र्यांच्या तालुक्यात वाळुतस्करांविरुद्ध नदीपात्रात झोपून पर्यावरणप्रेमींचे आंदोलन

आनंद गायकवाड
बुधवार, 16 जून 2021

वाळू उपशावर नियंत्रण आणि कारवाई करणाऱ्या महसूल खात्याची जबाबदारी असलेल्या मंत्र्यांच्या संगमनेर तालुक्यातच बेसुमार वाळू उपसा सुरु आहे.

संगमनेर : वाळू उपशावर नियंत्रण आणि कारवाई करणाऱ्या महसूल खात्याची जबाबदारी असलेल्या मंत्र्यांच्या (Ministar) संगमनेर तालुक्यातच बेसुमार वाळू उपसा सुरु आहे. (Environmentalists 'agitation against sand smugglers in these ministers' talukas)

अनेकदा प्रशासनाला विनंत्या करुनही तालुक्यासह संगमनेर शहरानजीकच्या प्रवरा पात्रातून सुरु असलेल्या वाळू उपशावर कारवाई होत नाही. यामुळे संतप्त झालेल्या संगमनेरकरांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. आज सकाळी आठच्या सुमारास शहरातील व्यापारी व पर्यावरणप्रेमींसह अनेक नागरिकांनी वाळू तस्करांविरोधात नदीपात्रातील वाळूच्या खड्ड्याजवळ झोपून आंदोलन करीत या प्रश्नाकडे प्रशासन व राज्यकर्त्यांचे लक्ष्य वेधले.

महसूलमंत्र्यांच्या मतदार संघात नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या वाळू तस्करांवर प्रशासन कारवाई करील. अशा अपेक्षेत आजवर वाट पाहणाऱ्या संगमनेरातील पर्यावरणप्रेमींची सातत्याने निराशाच होत असल्याने, अखेर आज त्यांच्या संयमाचा बांध तुटला. शहरासह उपनगरात सुरु असलेल्या लहान मोठ्या असंख्य बांधकामासाठी वाळू येते कोठून हा सर्वसामान्यांना सतावणारा प्रश्न प्रशासकिय अधिकारी व महसूल विभागाला कधीच पडत नाही.

वाळूतस्करांना प्रशासन व राज्यकर्त्यांचीही भीती नसल्याने ते उद्दाम झाले आहेत. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसवून जुनाट रिक्षांसह ट्रॅक्टर तसेच विविध वाहनांतून रात्रंदिवस वाळू उपसा सुरु असतो. प्रवरेच्या घाटावर टपोरी पंटरांचा वावर असल्याने याबाबत एकटा दुकटा नागरिक आवाज उठवू शकत नाही.

तालुक्यातील वाळू उपसा रोखण्यासाठी महसूलने तयार केलेली पथके कुठेतरी थातुर मातूर कारवाई करतात. मात्र भर दिवसा सुरु असणारा हा वाळू उपसा कोणालाही दिसत नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे. तालुक्यातील कासारा दुमाला ते संगमनेर खुर्द येथील मोठ्या पुलापर्यंत रात्रंदिवस अवैधरित्या वाळू उपसली जाते आहे. त्यामुळे नदी परिसरातील पुरातन घाट, मंदिरांना धोका निर्माण झाला आहे. 

नदीपात्रातून केलेल्या वाळू उपशामुळे असंख्य लहान मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. वाळू चोर बनावट पावत्या, कागदपत्रे दाखवून सुटका करून घेतात. वाळू उपशासाठी अनेक मध्यस्थ, दलाल तयार झाले असून, त्यांचे प्रशासनाशी लागेबांधे उघड करणाऱ्या ऑडिओ क्लीपही व्हायरल झालेल्या आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या काळातही हे प्रकार सुरुच होते. पावसाळ्यापूर्वी नदी पात्रातील वाळू साठवून ठेवण्यासाठी तस्करांची धावपळ सुरू असते.

याबाबत संगमनेरातील वृक्ष परीवाराच्यावतीने दिलेले निवेदन तलाठी पोमल तोरणे यांनी स्वीकारले. या निवेदनावर डॉ. राजेश मालपाणी, नीलेश जाजू, ओंकार भंडारी, शिरीष मुळे, राजेंद्र चांडक, कुलदिप ठाकूर आदींसह सुमारे 67 सह्या आहेत. या बेबंदशाहीला लगाम घालण्याची अनेक वर्षांची मागणी पूर्ण न झाल्यास यापेक्षाही तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
 

हेही वाचा..

थोरात म्हणतात,हा असेल हा माझ्या जीवनाचा महत्त्वाचा क्षण 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख