नगर : जिल्ह्यातील दोन नेत्यांनी नुकताच काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. आगामी काळात अनेक भाजपनेते काॅंग्रेसमध्ये येणार आहेत. अनेकजण संपर्कात आहेत, असा गाैप्य स्फोट करून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपला टोला लगावला आहे.
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी जोरात सुरू आहे. अशा परिस्थितीत थोरात यांनी केलेल्या या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणुकीच्या काळातच काही नेते भाजपमधून काॅंग्रेसमध्ये आल्यास त्याचा परिणाम संबंधित संपर्कातील ग्रामपंचायतींवर होणार आहे. राज्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर काॅंग्रेसचे वर्चस्व रहावे, यासाठी काॅंग्रेसच्या वतीने व्यूहरचना आखली जात आहे. थोरात यांच्या या वक्तव्याने काॅंग्रेस कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे.
काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचा विचार हा शास्वत विचार असून, तोच देश हिताचा आहे. सध्या देशात असलेले भाजपा-आरएसएस विचाराचे सरकार देशहिताचे नसून समाजात तेढ निर्माण करणारे आहे. पुन्हा एकदा राष्ट्र निर्माणासाठी मोठे कार्य करावे लागणार आहे, असे ते म्हणाले.
या वेळी थोरात म्हणाले की, केंद्रातील सरकारने गरीब माणसाला ताकद देणारे कामगार हिताचे कायदे बदलण्याचे काम केले आहे. काही मुठभर लोकांसाठी, साठेबाज लोकांसाठी कृषी कायदे केले आहेत. कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत एक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे, हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीला वेढा घातला आहे, पण केंद्र सरकारकडे सहानुभूती नाही, त्यांची भूमिका क्रूर व अडेलतट्टूपणाची आहे. शेतकरी मूलभूत प्रश्न विचारत आहेत परंतु केंद्र सरकार उत्तर द्यायला तयार नाही.
भाजपमधून मोठ्या प्रमाणात घरवापसी होणार असून, भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. पक्षाला लागलेली गळती पाहून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी, भाजपातून कोणीही जाणार नाही, असा खोटा दावा देवेंद्र फडणवीस यांना करावा लागत आहे, असेही थोरात म्हणाले..

