राळेगणसिद्धी : आम्ही लोकशाही स्विकारली असल्याने लोकशाहीत प्रत्येक मतदाराला निवडणुकीत उभे राहण्याचा व मतदानाचा मुलभूत अधिकार राज्यघटनेने दिलेला आहे. निवडणूक होणे हा दोष नाही आणि निवडणूक लढवणे, पण दोष नाही. फक्त निवडणुकीतील दोष बाजूला करणे गरजेचे आहे. निवडणुकीत भांडणे, हाणामाऱ्या न होता शांततेच्या मार्गाने लोकशाही पद्धतीने निवडणूक होणे महत्वाचे आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी व्यक्त केले.
राज्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर हजारे हजारे म्हणाले की, सन १८५७ ते १९४७ या नव्वद वर्षांच्या काळात भारतात लोकशाहीसाठी लोकांनी संघर्ष केला आहे. काही लोक फासावर गेले, काहींना तुरूंगवास झाला, तर काही भुमिगत झाले. इंग्रजांच्या हुकूमशाहीला लोक कंटाळले होते. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून लोकशाही अस्तित्वात आली असून, त्यांच्या त्यागाची जाणिव कार्यकर्ते व सर्व मतदारांनी ठेवली पाहिजे. निवडणुकीत फक्त मटन व दारू नको. निवडणुकीत दारू मटनाच्या अमिषाला बळी पडलेली तरूणपिढी व्यसनी होऊन त्याचे दूरगामी दुष्परिणाम होतात. हा दोष दूर केला पाहिजे.
ग्रामपंचायत निवडणुकांमुळे गट तट, राजकिय संघर्षाचे लोण पाच वर्ष राहते. दोन गटांत होणारे मतभेद, कटूता टाळण्यासाठी ग्रामविकासासाठी एकजूट होण्यासाठी बिनविरोध निवडणुकांना आपण पाठिंबा दिला होता. राज्यात अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत. निवडणूक लढवणे व मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार प्रत्येक मतदाराला लोकशाहीने दिला असल्याने लोकशाहीत निवडणुक होणे हा दोष नाही. फक्त निवडणुकीतील दोष बाजूला होऊन त्या शांततेने होणे लोकशाहीच्या बळकटीसाठी महत्वाचे आहे.
Edited By - Murlidhar Karale

