प्राजक्त तनपुरे यांच्या राहुरी तालुक्यात आठ दिवस "जनता कर्फ्यू' - Eight days 'Janata Curfew' in Prajakt Tanpure's taluka | Politics Marathi News - Sarkarnama

प्राजक्त तनपुरे यांच्या राहुरी तालुक्यात आठ दिवस "जनता कर्फ्यू'

विलास कुलकर्णी
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

कोरोनाचा धोका ओळखून नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचा राहुरी तालुका आठ दिवस बंद ठेवण्याचा आज निर्णय घेतला. तसेच त्यांनाही आज कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

राहुरी : कोरोनाचा धोका ओळखून नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचा राहुरी तालुका आठ दिवस बंद ठेवण्याचा आज निर्णय घेतला. तसेच त्यांनाही आज कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या 10 ते 17 सप्टेंबरदरम्यान तालुक्‍यात "जनता कर्फ्यू' लागू करण्यात येणार आहे.

अत्यावश्‍यक सेवा वगळता, सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहेत. पालिकेच्या सभागृहात प्रशासन, व्यापारी संघटना व विविध संस्थांच्या उपस्थितीत बैठक झाली. तीत हा निर्णय घेण्यात आला. तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम आदी उपस्थित होते.

"जनता कर्फ्यू' दरम्यान 15 व 18 सप्टेंबरला बाजार समितीत होणारा कांद्याचा मोंढा बंद राहील. शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणू नये, असे आवाहन बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी केले. ते म्हणाले, की तालुक्‍यात कोरोनाचे संक्रमण वेगाने फैलावत आहे. कोरोना झाल्यास गरिबांना उपचार परवडणारे नाहीत. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी लॉकडाउनची गरज आहे.

नगराध्यक्ष कदम म्हणाले, की लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नाशवंत शेतमालाची काळजी घेतली जावी. तहसीलदार शेख म्हणाले, की तालुक्‍यात बाधितांची संख्या 658 झाली आहे. पैकी 24 जणांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. शासनाचा लॉकडाउन करण्याचा विचार नाही. व्यापारी व नागरिकांनी निर्णय घ्यावा. 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख