जिल्हा बॅंकेत आपापल्या जागा बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न  - Efforts to make their respective seats in the District Bank uncontested | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्हा बॅंकेत आपापल्या जागा बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 30 जानेवारी 2021

जिल्हा सहकारी बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. 21 जागांसाठी 195 उमेदवार रिंगणात असून, त्यांतील शेवगाव व राहात्याच्या, सोसायटी मतदारसंघातील जागा बिनविरोध झाल्या आहेत.

नगर : जिल्हा सहकारी बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी एकत्रित महाविकास आघाडीच्या नावे लढवणार आहे. शुक्रवारी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. याशिवाय सोसायटी मतदारसंघातून आपापल्या जागा बिनविरोध करण्यासाठी नेत्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

जिल्हा सहकारी बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. 21 जागांसाठी 195 उमेदवार रिंगणात असून, त्यांतील शेवगाव व राहात्याच्या, सोसायटी मतदारसंघातील जागा बिनविरोध झाल्या आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षांसह जे बरोबर येतील, त्या घटक पक्षांनी मिळून महाविकास आघाडीच्या नावाखाली एकत्रित निवडणूक लढविण्यात येणार आहे. बैठकीला अजित पवार यांच्यासह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार अरुण जगताप, डॉ. किरण लहामटे, नीलेश लंके, रोहित पवार, आशुतोष काळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, उदय शेळके, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके उपस्थित होते. 

बैठकीत सर्व नेत्यांची मते जाणून घेत, एकदिलाने काम करून बॅंकेवर सत्ता मिळविण्याचे काम करू, असे एकदिलाने ठरले. दरम्यान, सोसायटी मतदारसंघातून प्रमुख नेत्यांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे आपापल्या मतदारसंघात बिनविरोध निवडून कसे येता येईल, यासाठी त्या-त्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सोसायटी मतदारसंघात बिनविरोध न झाल्यास बहुतांश ठिकाणी दुरंगी लढतीची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

यंदा चित्र वेगळेच असेल 

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत आतापर्यंत थोरात व विखे गटांतच बॅंकेची निवडणूक होत असे. यंदा मात्र भाजप विरुद्ध महाविकास आघाडी, अशा लढतीची शक्‍यता आहे. त्यात पवारांनी काल झालेल्या बैठकीत तीनही पक्षांशिवाय अन्य जे सोबत येतील, त्यांना बरोबर घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे यंदा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशा लढती होत असतानाच, फोडाफोडीलाही जोर येणार आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख