"ईडी'चा धंदा भाजपला महागात पडेल : विजय वडेट्टीवार  - ED's business will cost BJP dearly: Vijay Vadettiwar | Politics Marathi News - Sarkarnama

"ईडी'चा धंदा भाजपला महागात पडेल : विजय वडेट्टीवार 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 26 डिसेंबर 2020

आज खडसेंना नोटीस दिली, उद्या माझाही नंबर लागू शकतो. ईडीचा हा धंदा भाजपला महागात पडेल.

नगर : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी प्रवेश केल्यानंतरच लगेच `इडी`ची चौकशी त्यांच्या मागे लावली. इडीच्या वारंवार चौकशा सुरू झाल्या, तर जनता त्याची बिडी करून पेतील. आज खडसेंना नोटीस दिली, उद्या माझाही नंबर लागू शकतो. ईडीचा हा धंदा भाजपला महागात पडेल, असा इशारा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला.

ओबीसी समाजाच्या जिल्हास्तरीय जिल्हा मेळावा आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपने सत्ता व पैशांच्या जोरावर अनेक राज्यातील कॉंग्रेसप्रणित सरकार फोडले आहेत, असा आरोप करून ते म्हणाले, की सत्ता ही सर्वकाळ कोणाकडे कायम राहत नसते. भाजपला याची भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल. भाजपाकडून देशात बदला घेण्याचे राजकारण सुरू करण्यात आले आहे.

पैशाच्या जोरावर भाजपची सत्ता 

काॅंग्रेस पक्षाची देशातील अनेक राज्यांमध्ये सत्ता आली होती. सत्ता व पैशांच्या जोरावर संबंधित राज्यात भाजपने सत्ता आणली. कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यातील सत्ता फोडण्याचे काम भाजपने केले. लोकशाहीच्या दृष्टीने ही बाब अत्यंत घातक आहे. भाजपाने कायमस्वरुपी आपणच सत्ते राहू, अशा भ्रमात राहू नये. त्यांनी जे पेरले आहे, तेच उगवणार आहे. याची जाणीव ठेवावी, असा टोलाही त्यांनी लगावला. 

तिनही पक्षात मतभेद नाहीत 

महसूलमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील कॉंग्रेस बळकट होत आहे. नागपूरची जागा 58 वर्षांनी कॉंग्रेसने जिंकली आहे. पुणे पदवीधर मतदार संघाची जागाही कॉंग्रेसने जिंकली आहे. अनेक ठिकाणी भाजपची पिछेहाट सुरू झाली आहे. राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. महाआघाडीचा राज्य सरकार चालविण्याचा संयुक्त कार्यक्रम ठरलेला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

बारा बलुतेदार महामंडळ स्थापन करणार 

ओबीसी समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. बारा बलुतेदारांसाठी महामंडळ स्थापन करणार असून, त्यासाठी शंभर कोटींची तरतूद आगामी अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे. तसेच ओबीसी समाजातील मुलांना शिष्यवृत्तीसह रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. घाणा तेलाच्या माध्यमातून तेलनिर्मिती करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. ओबिसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी 74 कोटींची शिष्यवृत्ती वितरीत करण्यात आलेली असून, केंद्राने 90 कोटीच दिलेले आहेत. 50 टक्के शिष्यवृत्ती 100 टक्के करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे खूप मोठे प्रयत्न आहे. त्यांना त्यामधून दूर केल्यास आम्ही स्वस्थ बसणार नाही. मराठा आरक्षण मिळण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख