शिर्डीकरांनाही सुलभ साईदर्शन, साईसंस्थानच्या हालचाली - Easy Saidarshan to Shirdikars too, Sai Sansthan's movements | Politics Marathi News - Sarkarnama

शिर्डीकरांनाही सुलभ साईदर्शन, साईसंस्थानच्या हालचाली

सतीश वैजापूरकर
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

ग्रामस्थांनी "शिर्डी बंद'चा इशारा दिल्यावर, त्या पाठोपाठ आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यस्थी केल्यावर बगाटे यांनी हे बंद दरवाजे खुले केले.

शिर्डी : साईमंदिर परिसरातील तीन व चार क्रमांकाचे दरवाजे भाविकांना बाहेर जाण्यासाठी खुले करीत, साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी आज सकारात्मक पाऊल टाकले. ग्रामस्थांसाठी सुलभ दर्शनव्यवस्था करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे ग्रामस्थ व बगाटे यांच्यात विनाकारण निर्माण झालेली कटूता दूर होण्यास मदत होईल. मात्र, पंचक्रोशीतील भाविकांचा या सुलभ दर्शनव्यवस्थेत समावेश नसल्याने, आणखी नवा वाद निर्माण होण्याचीही शक्‍यता आहे. 

ग्रामस्थांनी "शिर्डी बंद'चा इशारा दिल्यावर, त्या पाठोपाठ आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यस्थी केल्यावर बगाटे यांनी हे बंद दरवाजे खुले केले. हे दरवाजे खुले ठेवून, स्थानिकांची दर्शनव्यवस्था सुरू ठेवली असती, तर ही कटुता निर्माण झाली नसती. रोज 20 हजार भाविक दर्शन घेतात; मग शे-दोनशे ग्रामस्थ आणि पाच-दहा इलेक्‍ट्रॉनिक्‍स प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधींची त्यात भर पडली, तर बिघडले कोठे? सहज प्रवेशाचा हक्क समजून आचारसंहितेचा कुणी भंग करू नये. लाभ पदरात पाडून भाविकांना दर्शन देणे. संस्थान प्रशासनाला फुटकचे सल्ले देणे, मंदिर परिसरात तळ ठोकून राहणे, या बाबी माध्यम प्रतिनिधींना टाळाव्यात, ही संस्थान प्रशासनाची अपेक्षा रास्त आहे. 

बगाटे यांनी केलेल्या नियमावलीत दररोज एक हजार ग्रामस्थ दर्शनासाठी येतील, असे गृहित धरले. प्रत्यक्षात दररोज येणाऱ्या ग्रामस्थांची संख्या शंभराच्या आत आहे. एक हजार भाविकांत राहाता, कोपरगाव व श्रीरामपूर तालुक्‍यांतील भाविकांची दर्शनव्यवस्था होऊ शकेल. मात्र, नियमावर बोट ठेवून शेजारील गावातील भाविकांना प्रवेश नाकारला, तर नवा वाद आणि कटुतेला पुन्हा सामोरे जावे लागेल. 
साईमंदिर हे अध्यात्मिक केंद्र आहे. जिल्हा परिषद किंवा मंत्रालय नाही, हे लक्षात घेऊन दर्शनव्यवस्था सुरू ठेवायला हवी. स्थानिकांसाठी दर्शन नियमावली तयार करणे, त्यास कायदेविषयक स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करण्यातून काही साध्य होणार नाही. कारण, नवे विश्वस्त मंडळ येथे येईल, कोविडचा प्रभाव कमी होईल, त्यावेळी या नियमावलीला काहीही अर्थ राहणार नाही, हेही लक्षात घ्यायला हवे. या विषयाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

माध्यमांसोबत विनाकारण वाद 

स्थानिक ग्रामस्थ, पदयात्री भाविक व इलेक्‍ट्रॉनिक्‍स माध्यमांचे प्रतिनिधींना साईमंदिर परिसरात प्रवेश करण्यासाठी जाचक नियमावली तयार करण्यात आली. साईसंस्थानच्या इतिहासात पहिल्यांदा असे घडले. त्यामुळे माध्यम प्रतिनिधी व बगाटे यांच्यात विनाकारण संघर्ष व कटूता निर्माण झाली. आता हा संघर्ष मिटविण्यासाठीदेखील आमदार राधाकृष्ण विखे पाटील पुढाकार घेणार आहेत. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख