ग्रामपंचायतीचा धुराळा ! थोरात-विखे गटात पुन्हा राजकीय युद्ध - Dust of Gram Panchayat! Political war again in Thorat-Vikhe group | Politics Marathi News - Sarkarnama

ग्रामपंचायतीचा धुराळा ! थोरात-विखे गटात पुन्हा राजकीय युद्ध

आनंद गायकवाड
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020
संगमनेर तालुक्यातील एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 94 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी संगणकिकृत कार्यक्रमाला सुरवात झाली आहे.

संगमनेर : कोरोनाच्या पार्श्वभुमिवर ग्रामपंचायतींची मुदत संपूनही, निवडणूका सुमारे सहा महिने पुढे ढकलण्यात आल्या होत्या. गावातील कारभाऱ्यांऐवजी प्रशासकामार्फत कारभार सुरु असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने ग्रामीण भागातील राजकिय वातावरण ढवळण्यास सुरवात झाली आहे. संगमनेर तालुक्यात आता काॅंग्रेसचे नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटात पुन्हा राजकीय युद्ध सुरू होणार आहे.

संगमनेर तालुक्यातील एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 94 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी संगणकिकृत कार्यक्रमाला सुरवात झाली आहे. संगमनेर तालुक्यातील गावे भौगोलिकदृष्ट्या संगमनेर तालुक्यात असली, तरी अकोले विधानसभा मतदार संघाला 25 तसेच मतदार संघ पुर्नरचनेत आश्वी गटातील 26 गावे शिर्डी विधानसभा मतदार संघाला जोडल्याने तालुक्यात तीन विधानसभा मतदार संघ आहेत. त्य़ापैकी मुदत संपलेल्या 94 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.

या विभाजनामुळे तालुक्यातील राजकारणाला थोरात विरुध्द विखे अशी पार्श्वभुमी लाभली आहे. मतदार संघ पुर्नरचनेमुळे विखे यांचा थेट जोर्व्यापर्यंत मतदार संघ असल्याने या राजकिय लढ्याची धार अधीक तीव्र झाली आहे. तालुक्यातील 83 ग्रामपंचायती मंत्री थोरात यांच्या काँग्रेस पक्षाच्या वर्चस्वाखाली आहेत. आश्वी गटातील 28 गावांमधील निवडणुकीत पूर्वी एकाच पक्षात असले, तरी एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून विखे व थोरात या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागत असे. आता तर थेट विरोधी पक्षातच असल्याने हा संघर्ष अधीकच तीव्र झाला आहे.

आश्वी गटातील 14 पैकी 11 ग्रामपंचायतींवर विखे यांचे, तर 3 ग्रामपंचायतीवर थोरात यांची सत्ता असल्याने निवडणूक भाजपा विरुध्द काँग्रेस अशी रंगणार आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या तालुक्यातील युवकांशी असलेला संपर्क व थोरातांचे विरोधक यांची या निवडणुकांमध्ये एकी होते काय, याकडे अनेकांचे लक्ष्य लागले असले तरी, या दोन्ही दिग्गज नेत्यांसाठी या निवडणूका अस्तित्वाची लढाई असल्याने जोरदार लढत होण्याची अटकळ बांधली जात आहे. मात्र सरपंचपदाची आरक्षण प्रक्रिया निवडणुकीनंतर होणार असल्याने अनेकांची स्वप्न हवेत विरली आहेत.

शिर्डी विधानसभा मतदार संघातील कनोली, पिंप्रीलौकी अजमपूर, चिंचपूर खुर्द, चणेगाव, झरेकाठी, पानोडी, प्रतापपूर, शेडगाव, ओझर बुद्रुक, औरंगपूर, खळी, दाढ खुर्द, शिबलापूर व मनोली या 14 ग्रामपंचायतींची, तर संगमनेर विधानसभा मतदार संघातील कऱ्हे, पारेगाव खुर्द, लोहारे, पळसखेडे, सोनेवाडी, वेल्हाळे, जवळे कडलग, कासारा दुमाला, राजापूर, निमगाव बुद्रूक, निमगाव खुर्द, पेमगिरी, खांडगाव, जाखुरी, देवगाव, हिवरगाव पावसा, रायतेवाडी, कुरण, समनापूर, तिगाव, कोकणगाव, खांबे, मिरपूर, पिंपळे, देवकौठे, पारेगाव बुद्रूक, कासारे, चिखली, मंगळापूर, वडगाव लांडगा, शिरसगाव धुपे, सावरचोळ, सांगवी, कौठे धांदरफळ, मिर्झापूर, नांदुरी दुमाला, डिग्रस, रायते, निमगाव टेंभी, शिरापूर, संगमनेर खुर्द, चंदनापुरी, झोळे, कोंची मांची, माळेगाव हवेली, सुकेवाडी, सावरगाव तळ, शिंदोडी, वडगावपान, मालदाड, सोनोशी, कौठे मलकापूर, हिवरगाव पठार, खरशिंदे, शेंडेवाडी, वरवंडी, मेंढवण, कौठे कमळेश्वर, व खांजापूर या 59 गावात निवडणूक होत आहे. तर तालुक्यातील अकोले विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या पठार भागातील अकलापूर, बोटा, पिंपळगाव माथा, कौठे बुद्रूक, खंदरमाळवाडी, नांदूर खंदरमाळ, पिंपळगाव देपा, भोजदरी, माळेगाव पठार, म्हसवंडी, कुरकुंडी, आंबी खालसा, कौठे खुर्द, आंबी दुमाला, कुरकुटवाडी, वनकुटे, पोखरी बाळेश्वर, वरुडी पठार, सावरगाव घुले, जवळेबाळेश्वर व महालवाडी या 21 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. नवीन वर्षाचे स्वागत करताना निव़डणूकीच्या धामधुमीमुळे वातावरण तापणार आहे.

Edited By - Murlidhar karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख