अकोले : मराठा समाजाला वेठीस न धरता सरकारने आम्हाला आमचा न्याय हक्क मिळवून द्यावा. अन्यथा आम्ही तरुणी रस्त्यावर उतरून यापेक्षा अधीक तीव्र आंदोलन करू. आज आरक्षणाचा मुद्दा अडकल्याने नोकरी मिळण्यासाठी मराठा समाजातील युवक-युवती दाही दिशा फिरत आहे. त्यामुळे आता मराठा समाजाचा अंत पाहू नका, असा इशारा मराठा मोर्चाच्या विद्यार्थी संघटनेच्या तालुकाध्यक्षा अश्विनी काळे या विद्यार्थीनीने दिला.
`एक मराठा, लाख मराठा,` `छत्रपती शिवाजी महाराज की जय`, अशा घोषणा देत आज मराठा समाजाने अकोले येथे मोठा मोर्चा काढला. नंतर झालेल्या सभेत सरकारवर टीका केली. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी आज आंदोलकांनी शहर दणाणून सोडले. या वेळी माजीमंत्री मधुकरराव पिचड, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे, मराठा क्रांती मोर्चाचे सुरेश नवले, मारुती मेंगाळ, दीपक देशमुख, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, रेश्मा गोडसे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा प्रश्न पोडतिडकीने मांडत विद्यार्थ्यांनी आजच्या आंदोलनात मोठा सहभाग घेतला. युवक-युवतींची संख्याही जास्त असल्याने मराठा नेत्यांनी युवकांचे काैतुक केले.
Edited By - Murlidhar Karale

