जगताप, गोंदकर यांच्या माघारीमुळे शिर्डीच्या नगराध्यक्षपदी गोंदकर निश्चित

पडद्यामागील नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर भाजपचे नगरसेवक शिवाजी अमृतराव गोंदकर यांची आज नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्‍चित झाली.
shivaji gondkar.png
shivaji gondkar.png

शिर्डी : पडद्यामागील नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर भाजपचे नगरसेवक शिवाजी अमृतराव गोंदकर यांची आज नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्‍चित झाली. याबाबतची अधिकृत घोषणा येत्या सोमवारी (ता. 7) होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी माजी नगराध्यक्ष अनिता जगताप व माजी उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर यांनी माघार घेतली. गेल्या 20 वर्षांपासून नगरसेवक असलेले नूतन नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर हे सभागृहातील सर्वाधिक अनुभवी नगरसेवक आहेत. जनसंघाच्या स्थापनेपासून त्यांचे वडील अमृतराव व गोंदकर परिवार हा संघ परिवारासोबत जोडलेला आहे. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नगरपंचायतीमधील राजकीय समीकरणे बदलली. भाजपचे संख्याबळ तीनवरून 16पर्यंत वाढले. या पार्श्वभूमीवर या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तथापि, बिनविरोध झालेल्या निवडणुकीत पडद्यामागे नाट्यमय अनेक घटना घडल्या. सुरवातीला सुजित गोंदकर व जगन्नाथ गोंदकर यांच्यात लढत होईल, असे चित्र होते. मात्र, गोंदकर यांचा उमेदवारीअर्ज बाद ठरला. त्यानंतर तासाभरात नव्या राजकीय समीकरणांची जुळणी सुरू झाली. माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके यांच्याकडे तीन मते असल्याने, ते जिकडे जातील तिकडचे पारडे जड होणार, हे उघड होते. त्यांनी शिवाजी गोंदकर यांच्या पारड्यात आपले वजन टाकले. वातावरण बदलण्यास सुरवात झाली. फेरजुळणी सुरू झाली. मूळ भाजपचे तीन, शेळके यांची तीन, मनसे, शिवसेना व एक अपक्ष, असे गोंदकर यांच्याकडे विजयासाठी आवश्‍यक असलेले 9 संख्याबळ तयार झाले. हे सर्व जण बाहेरगावी रवानादेखील झाले. संख्याबळात आणखी भर पडण्याची चिन्हे दिसू लागली. विशेष म्हणजे, आपली निवड होईपर्यंत शिवाजी गोंदकर यांनी कमालीचा संयम पाळला. एकही जाहीर विधान केले नाही. त्याचा त्यांना मोठा फायदा झाला. सर्व नाट्यमय घडामोडींनंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज स्पर्धेतील अन्य दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. शिवाजी गोंदकर यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले. येत्या सात डिसेंबरला नगराध्यक्षपद निवडीसाठी विशेष सभा बोलाविली आहे. तीत त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा होईल. निवडणूक होईल, असे गृहीत धरून विजयासाठी आवश्‍यक असलेले 9 संख्याबळ सोबत घेऊन गोंदकर व त्यांचे सहकारी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे आजच्या विजयाचा आनंदही या सर्वांना बाहेरगावी साजरा करण्याची वेळ आली. विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्यासह सर्व सहकारी नगरसेवकांना बरोबर घेऊन शहरविकासाचे निर्णय घेऊ. भाजपने याआधी माझ्यावर उद्योग आघाडीचा संयोजक म्हणून जबाबदारी दिली. या दोन्ही जबाबदाऱ्या आपण समर्थपणे पार पाडू, असे मत शिवाजी गोंदकर यांनी व्यक्त केले. Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com