नगर : महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांची आज निवड झाली. शिवसेनेकडे दोन जागा होत्या. त्यापैकी एका जागेवर दिवंगत नेते अनिल राठोड यांचे पूत्र माजी नगरसेवक विक्रम राठोड यांना संधी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची भावना होती. तथापि, त्यांनी हे पद घेण्यास नकार दिला. त्यामागे त्यांची भूमिका व्यापक होती. `सरकारनामा`शी बोलताना त्यांनी आपले मत स्पष्ट केले.
शिवसेनेच्या वतीने स्वीकृत नगरसेवक म्हणून मदन आढाव व संग्राम शेळके यांची वर्णी लागली. या दोन जागांपैकी एक जागा विक्रम राठोड यांना मिळावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांची होती. कारण दिवंगत नेते अनिल राठोड यांनी शहरासाठी, शिवसेना वाढीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच पूत्र विक्रम यांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी विक्रम यांना मिळावी, अशी मागणी होती. तथापि, स्वतः विक्रम राठोड यांनीच याबाबत नकार देत इतर कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असे सांगितले.
विक्रम राठोड म्हणाले, वडिलांच्या विचारावर मी चालणार आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी द्यावी, ही त्यांची कायम भूमिका होती. ते हयात असताना त्यांनी नावे सुचविली होती. त्यांच्या शब्दाला मान देऊन शिवसेनेच्या नेत्यांनी तीच नावे अंतीम ठेवली. यातच त्यांच्या कार्याची पावती मिळते. स्वीकृत नगरसेवक म्हणून मी पद स्विकारावे, अशी अनेक कार्यकर्त्यांची, नेत्यांची इच्छा होती. त्यासाठी शिवसेनेचे नेते जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर तसेच सर्वच नेत्यांनी मला आग्रह धरला होता. मात्र वडिलांच्या इच्छेविरोधात मी कोणताही भूमिका घेणार नसल्याचा माझा निश्चय होता. यापुढेही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी माझा कायम प्रयत्न असेल. मला वडिलांकडून बाळकडू मिळाले. सर्वसामान्यांसाठी त्यांचे जगने हे मी बालपणापासून अनुभवले. त्यामुळे त्यांच्या इच्छेनुसारच या निवडी झाल्या आहेत.

