राहुरी : तब्बल दोन दशकांनंतर तालुक्याला फसियोद्दीन शेख यांच्या रूपाने उत्कृष्ट तहसीलदार लाभले. जिल्हाधिकारी राहुल द्ववेदी यांनी पुरस्कार देऊन नुकताच त्यांचा गौरव केला. तरुण, अभ्यासू, झटपट निर्णयक्षमता, सकारात्मक दृष्टिकोन, जनतेशी सुसंवाद या गुणांमुळे त्यांनी सर्व घटकांना आपलेसे केले. शासनाच्या योजना व सुविधा तळागाळात पोहोचविल्या. निवडणूक, नैसर्गिक आपत्ती, कोरोना परिस्थिती उत्कृष्ट हाताळली. या त्यांच्या जमेच्या बाजू ठरल्या.
तहसीलदार शेख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सूत्रबद्ध नियोजन करून, उत्तम कामगिरीचा ठसा उमटविला. तालुक्यातील काही गावे तीन मतदारसंघात विभागली आहेत. अल्पावधीत मतदार संघातील माहिती संकलित करून, कर्मचारी, वाहतूक नियोजन, स्ट्रॉंग रुम, मतदान केंद्र, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी येणार्या समस्या, मतदान यंत्रे बंद पडल्यावर प्रक्रिया निर्विघ्न पार पाडण्यासाठी धावपळ करून, खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडली.
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात म्हैसगाव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. शेरी-चिखलठाण येथे बंधारे फुटले. त्या भागात प्रत्यक्ष फिरून, नुकसानीची पाहणी, पंचनाम्याची व्यवस्था, जनतेला आधार दिला. शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळवून दिली. कोळेवाडी सारख्या दुर्गम आदिवासी गावात ५० वर्षांपासून शेतकऱ्यांच्या जमिनी वाटपाविना प्रलंबित होत्या. समाधान शिबिरांचे वेळोवेळी आयोजन करून, शेतकऱ्यांची खातेफोड करुन, हक्काचा सातबारा उतारा दिला. कर्जमाफी प्रक्रिया यशस्वी राबविली. त्यामुळे राज्यात सर्वप्रथम तालुक्यातील ब्राह्मणी गाव कर्जमुक्त झाले.
मार्च महिन्यात कोरोनाचे लॉकडाऊन सुरु झाले. तात्काळ प्रत्येक गावात कोरोना ग्राम सुरक्षा समिती गठित केली. गावांच्या सीमा बंद केल्या. जनजागृती मोहीम सुरू केली. पहिल्या अनलॉक पर्यंत तालुक्यात कोरोना संसर्ग रोखण्यात यश मिळविले. अनलॉक सुरु झाल्यानंतर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला. तरी, परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही. यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना परिस्थितीत उत्तम नियोजन केले. त्याचे फलित पुरस्काराच्या रूपाने प्राप्त झाले.
Edited By - Murlidhar Karale

