शनिअमावस्या यात्रेलाच 'देऊळ बंद'मुळे पाच कोटी रुपयांची उलाढाल हुकली - Due to 'temple closure', the turnover of Rs | Politics Marathi News - Sarkarnama

शनिअमावस्या यात्रेलाच 'देऊळ बंद'मुळे पाच कोटी रुपयांची उलाढाल हुकली

विनायक दरंदले
शनिवार, 13 मार्च 2021

माघ महिन्यात आलेल्या या दर्श अमावस्या यात्रेला दहा ते बारा लाख भाविकांची गर्दी झाली असती. मात्र कोरोना संसर्गाची वाढती स्थिती लक्षात घेवून देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत व प्रशासनाने यात्रा रद्दचा निर्णय घेतला होता.

सोनई : शनिशिंगणापुर येथील शनिअमावस्या यात्रा रद्द झाल्याचा मोठा आर्थिक फटका व्यावसायिक व देवस्थान ट्रस्टला झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील कोरोना स्थितीमुळे यात्रा रद्द करत 'देऊळ बंद' केल्याने पाच कोटी रुपयांची उलाढाल हुकल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

माघ महिन्यात आलेल्या या दर्श अमावस्या यात्रेला दहा ते बारा लाख भाविकांची गर्दी झाली असती. मात्र कोरोना संसर्गाची वाढती स्थिती लक्षात घेवून देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत व प्रशासनाने यात्रा रद्दचा निर्णय घेतला होता. शुक्रवारी दुपारी तीन वाजता मंदिर बंद करण्यात आले. महाद्वार परिसरात पोलिस व सुरक्षा कर्मचारी तैनात करुन सर्व भाविकांना प्रवेश रोखण्यात आला. शनिवारी पहाटे आरती सोहळा झाल्यानंतर बंदोबस्त वाढविण्यात आला. 

मागील वर्षी कोरोनामुळे दहा महिने मंदिर बंद होते. अमावस्या यात्रेची सर्वांना आशा होती. मात्र यात्रा रद्द झाल्याने सर्वांचीच आर्थिक कोंडी झाली आहे. यात्रा भरली असती तर दहा ते बारा लाख भाविकांची गर्दी होवून तीस हजार लिटरहून अधिक तेल शनिमूर्तीवर पडले असते. निवास, चहा नाश्ता, जेवणाचे हाॅटेल, पूजा साहित्य, वाहतूक व देवस्थानला देणगी मोठ्या प्रमाणात भेटली असती.

शुक्रवारी रात्री बारा वाजता उद्योजक सौरभ बोरा, शनिवारी पहाटे माजी खासदार चंद्रकांत खैरे व डाॅ. राहुल हेगडे यांच्या हस्ते आरती सोहळा झाला. देवस्थानच्या चारशे वर्षाच्या इतिहासात प्रथमच यात्रेचा दिवस सुनासुना राहिला. दोन दिवसात अंदाजे फक्त दहा ते पंधरा हजार भाविक कळस व महाद्वाराचे लांबून दर्शन घेवून परतले.

प्रशासनाच्या सुचनेनंतर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदीरातील प्रवेश पुर्णपणे बंद ठेवला होता.कोरोना संसर्गाची काळजी घेण्यात आली.देणगी,प्रसाद विक्रीसह सर्व उत्पन्नावर मोठा परिणाम झाला.
- नितीन शेटे,कार्यकारी अधिकारी, शनैश्वर देवस्थान 

वीस वर्षापासून अमावस्या यात्रेची खेट चुकविली नव्हती.यात्रा रद्द असतानाही फक्त या पावनभुमीत येवून बाहेरूनच कळसाचे दर्शन घेतले.कोरोनाची स्थिती लक्षात घेवून घेतलेला निर्णय योग्यच आहे. 
- प्रमोद मित्रा,चारकोप,मुंबई

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख