Due to the patient on Kalyan Road, the city circle is complete, there are seven positives in the district today | Sarkarnama

कल्याण रोडवरील रुग्णामुळे नगर शहराचे वर्तुळ पूर्ण, जिल्ह्यात आज सात पाॅझिटिव्ह

सरकारनामा ब्युरो
रविवार, 14 जून 2020

नगर शहरातील कल्याण रोडवरील एकजण पाॅझिटिव्ह आढळल्याने मुख्य शहरासह कोरोनाने संपूर्ण शहराला वेढा देवून वर्तुळ पूर्ण केले आहे. शहराजवळील केडगाव येथील दोन वक्तीं बाधित निघाल्या.

नगर : जिल्ह्यातील सात जणांचे कोरोना अहवाल आज सकाळी आलेल्या अहवालात पाॅझिटिव्ह आले आहेत. नगर शहरातील कल्याण रोडवरील एकजण पाॅझिटिव्ह आढळल्याने मुख्य शहरासह कोरोनाने संपूर्ण शहराला वेढा देवून वर्तुळ पूर्ण केले आहे. शहराजवळील केडगाव येथील दोन वक्तीं बाधित निघाल्या. राहाता येथील एक, तर संगमेर येथील दोन व्यक्तींना बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाले.

नगर शहरातील पुर्वेकडील असलेला सर्वप्रथम मुकुंदनगर परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळला होता. तेथे कोरोनाचे नंतर अनेक रुग्ण सापडले. नंतर दक्षिणेकडील सारसनगर, माळीवाडा येथे रुग्ण सापडले. त्यामुळे नगर शहराचा अर्धा भाग कोरोनाने व्यक्त केल्याचे स्पष्ट झाले. शहराच्या उत्तरेकडील एमआयडीसी परिसरातील गजानन काॅलनीत दोन रुग्ण सापडले. आता पश्चिमेला असलेल्या कल्याण रोड व केडगावमध्येही रुग्ण सापडल्याने शहराचे वर्तुळ पूर्ण झाले आहे. यापूर्वी नालेगाव, दातरंगे मळा येथेही रुग्ण सापडले आहेत. शहराचा मध्यभाग असलेला सर्जेपुरा, तेलीखुंट भागातही यापूर्वी रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जवळजवळ संपूर्ण शहराला वेढा देवून शहर कोरोनाच्या दहशतीखाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संगमनेर, राहाता येथे खंड नाही

संगमनेर व राहाता तालुक्यात कोरोनाच्या रुग्ण सापडण्याचा खंड पडेना. गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून तेथे रोज दोन-तीन रुग्ण सापडत आहेत. एका दिवशी तर संगमनेरमध्ये सात रुग्ण सापले होते. या दोन्ही शहरातील कोरोना हटण्याचे नाव घेत नाही. अनेक नागरिक स्वतःच्या मनाने कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. अधिकारी व पोलिसांनाही लोक जुमानत नाहीत. त्यामुळे कोरोनाला आवर घालणे शक्य होत नाही. याबाबत येथील पदाधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. संगमनेरचे आमदार तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राहात्याचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची स्वतःची यंत्रणा वापरून कोरोनाला आवर घालण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे, अशी लोकांची अपेक्षा आहे.

जिल्ह्यातील कोरोनारुग्णांची संख्या केवळ नगर शहर, राहाता व संगमनेर तालुक्यातच वाढत आहे. इतर तालुक्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत नाहीत. जामखेड व पारनेर तालुका यापूर्वीच कोरोनामुक्त झाला आहे. कर्जत तालुक्यात रुग्ण सापडला होता, मात्र ती साखळी आता खंडीत झाली आहे. शेवगाव, पाथर्डी येथील रुग्णांची साखळी तुटली आहे. त्यामुळे या वरील तीन शहरांवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. यावर नियंत्रण आणल्यास जिल्हा कोरोनामुक्त होईल.

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख