नगर : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत श्रीगोंदे तालुक्यातून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी आमदार राहुल जगताप यांना बिनविरोध होण्यासाठी विधानपरिषदेचे आमदार अरुण जगताप यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती, असे मानले जाते. परंतु त्यांचेच व्याही असलेले भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना बिनविरोध करण्यासाठी ते कमी पडले.
जिल्हा सरकारी बॅंक ही जिल्ह्याची कामधेनू आहे. शेतकऱ्यांची तारणहार म्हणून या बॅंकेचा लाैकिक आहे. साखर कारखान्यांचे जाळे विणण्यात या बॅंकेचा मोलाचा सहभाग आहे. त्यामुळे साहजिच सर्व साखर सम्राट, मोठे नेते या बॅंकेचे संचालक होऊ इच्छितात. या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी आपापले गड राखण्यासाठी राजकीय डाव टाकले. त्याचाच परिपाक म्हणून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व शाबूत राहिले. आमदार आशुतोष काळे, माजी आमदार राहुल जगताप, अमोल राळेभात या युवा नेत्यांचीही वर्णी लागू शकली.
हेही वाचा.. कर्डिलेंनी अजितदादांऐवजी थोरातांकडे चकरा मारल्या अन...
या सर्व घडामोडीत भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले मात्र बिनविरोध होण्याचे बाकी राहिले. त्यांच्या विरोधात एक अर्ज मागे राहिल्याने त्यांची लढत निश्चित झाली. असे असले, तरी सेवा संस्थांचे बहुतेक ठराव त्यांच्या बाजुने आहेत. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जातो. परंतु बिनविरोध होण्यासाठी ते प्रयत्नात कुठे कमी पडले, हा संशोधनाचा विषय ठरावा.
हेही वाचा... विखे पाटील, तनपुरेंनी कर्डिलेंना झुंजायला लावले
त्यांचे व्याही आमदार अरुण जगताप यांनी श्रीगोंद्यात पाचपुते गटाला धोपीपछाड करीत राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांना बिनविरोध करण्यात मोठी भूमिका निभावली. त्यांच्यामुळे जगताप बिनविरोध होऊ शकले, असे सांगितले जाते. या सर्व राजकारणात मात्र जगताप यांचे व्याही असलेले कर्डिले यांच्याकडे जगताप यांनी का नाही लक्ष दिले, याबाबत राजकीय गोटातून चर्चा सुरू आहे. की `हाय कमांड`वरून काही वेगळा आदेश होता का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
Edited By - Murlidhar Karale

