Driving home in Mumbai! Pathardi came and went | Sarkarnama

मुंबईतील वाहनचालक मायघरी ! पाथर्डीत आलेला निघाला बाधित

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 18 जून 2020

नगर जिल्ह्यातील अनेकजण मुंबईत कामानिमित्त गेले आहेत. विशेषतः पाथर्डी तालुक्यातील अनेक युवक कामानिमित्त मुंबईला जातात. तेथे वाहनचालक म्हणून नोकरी करणे पसंत करतात.

नगर : पाथर्डी तालुक्यातील बहुतेक गावांतील लोक वाहनचालक म्हणून मुंबईत नोकरीला आहेत. बहुतेकांच्या टॅक्सी आहेत, तर काहींचे टेंम्पो आहेत. काही मालवाहतूक ट्रक घेवून मुंबईवारी करीत असतात. हे चालक आता हळूहळू गावाकडे येऊ लागले आहेत. विशेष म्हणजे तेथे त्यांना त्रास होऊ लागल्यास तेथेच रुग्णालयात दाखल होण्याएेवजी ते नगर जिल्ह्यात येवून येथील रुग्णालयात दाखल होणे पसंत करीत आहेत. त्यामुळे नगरचा आकडा वाढू लागला आहे.

आज सायंकाळी आलेल्या कोरोना अहवालापैकी चारजण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. चारपैकी संगमनेर तालुक्यातील दोघांचा समावेश आहे. पुण्याहून निमगाव पागा येथे आलेल्या 38 वर्षीय व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली. याच तालुक्यातील कोल्हेवाडी येथील एक युवतीला बाधा असल्याचे स्पष्ट झाले. पाथर्डी तालुक्यातील माणिकदाैंडी येथील 33 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळली. संबंधित व्यक्ती कुर्ला नेहरूनगर (मुंबई) येथे वाहनचालक म्हणून नोकरी करीत होता. तसेच भोरये पठार येथील व्यक्तीही मुंबईत वाहनचालक म्हणून काम करीत होता. तोही कोरोनाबाधित आढळला आहे.

यापूर्वीही पाथर्डी तालुक्यातील एक व नगर शहरातील बोल्हेगाव फाटा परिसरात एक व्यक्ती कोरोनाबाधित होत्या. दोघेही कुर्ला येथे वाहनचालक म्हणून काम करीत होते. त्यांच्यामुळे संबंधित कुटुंबालाही तपासणीला सामोरे जावे लागले.

नगर जिल्ह्यातील अनेकजण मुंबईत कामानिमित्त गेले आहेत. विशेषतः पाथर्डी तालुक्यातील अनेक युवक कामानिमित्त मुंबईला जातात. तेथे वाहनचालक म्हणून नोकरी करणे पसंत करतात. मुंबईत बहुतेक युवकांच्या टॅक्सी आहेत. काही लोकांचे भाजीपाला विक्रीचे टेम्पो आहेत. तर अनेकांच्या स्वतःच्या मालकीच्या मालवाहतूक ट्रका आहेत. त्यामुळे या लोकांची अधूनमधून गावाकडे येणे-जाणे सुरू असते. लाॅकडाऊन सुरू झाल्यानंतर त्यांना मुंबईहून येथे येणे शक्य नव्हते. आता प्रशासनाकडून सवलत मिळाली असल्याने ही मंडळी आता गावी परतू लागली आहे. 

त्रास झाल्यानंतर धरतात नगरचा रस्ता

कोरोनाची बाधा झाल्यानंतर मुंबईतील शासकीय रुग्णालयात दाखल होण्यापेक्षा नगरच्या रुग्णालयात दाखल होणे काही लोक पसंत करीत असल्याचे समजते. त्यामुळे मुंबईहून येतानाच त्रास होत असतानाही अनेक व्यक्ती नगरला दाखल होतात. येथे जास्त त्रास जाणवल्यास डाॅक्टरांकडे जातात. अन्यथा तात्पुरता इलाज करून स्वतः काळजी घेतात. जिल्हाबंदी असतानाही काहीजण प्रशासनाला चुकवून जिल्ह्यात येतात. याबाबत दक्षता घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाची कसून चाैकशी झाल्यास व तपासणी केल्यास त्याची बाधा इतर रुग्णांनाही होणार नाही. याबाबत आता प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख