नगर : महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा भाजप सरकारने विडाच उचलला आहे. सर्वच भाजप नेत्यांना आता सत्तेचे स्वप्न पडू लागले आहेत. `मी पुन्हा येईल`चा पुनरुच्चार पुन्हा सुरू होईल. परंतु सरकारबाबतच्या भाकिताची सुरुवात नगरमधून झाली आहे. माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी दोन दिवसांपूर्वीच `राजकीय बाॅंब` टाकला, त्यालाच जोडून आता माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी स्फोट घडविला आहे.
माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी नुकतेच सरकारविषयी भाकित करून केवळ दोनच महिने सरकार टिकेल, असे म्हटले होते. त्यांचाच कित्ता आता माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी गिरविला आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर टीका करताना हे जनताविरोधी सरकार असल्याने लवकरच त्याचा कार्यक्रम होईल, असे म्हटले आहे.
प्रा. शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर टीका केली. राज्यातील सरकार केवळ केंद्राकडे बोट दाखविण्याचे काम करते. प्रत्यक्षात तीनही पक्षांत धुसफूस सुरू आहे. सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने त्यांनी वर्षभरात काय काम केले, हे दाखवावे. ते सारखे म्हणतात केंद्राने काय केले, त्यांनीच सांगावे की त्यांनी वर्षभर काय केले. केंद्राने जे दिले ते या सरकारने नीट वाटले सुद्धा नाही. हे सरकार जनतेच्या विरोधातील आहे. त्यामुळे ते फार काळ टिकणार नाही. लवकरच त्यांचा `कार्यक्रम` होणार आहे. तिनही पक्ष एकमेकांना केवळ सावरण्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे हे फार काळ टिकू शकत नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
विखे पाटील काय भूमिका मांडणार
दरम्यान, गेल्या वर्षभरात सरकारवर टीका करण्याची कोणतीच संधी भाजप नेत्यांनी सोडली नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी `मी पुन्हा येईल` असे सांगून सरकारच्या विरोधात भाजपमध्ये पक्षांतर्गत डाव टाकत असल्याचे अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केले. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविण्याची भूमिका घेणे, हे विरोधी पक्षाचे कामच आहे. त्यामुळे त्यांनी ही भूमिका चांगली वठविली आहे. याबरोबरच नगर जिल्ह्यातील अभ्यासू नेते म्हणून भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री शिवाजी कर्डिले आदी नेत्यांकडे पाहिले जाते. कर्डिले यांनी सरकारविषयीचे भाकित करून या विषयाची ठिणगी टाकली. या वक्तव्याचा प्रा. राम शिंदे यांनीही पुनरुच्चार केला. आता विखे पाटील सरकारबाबत काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे.

