बेकायदा गर्भपात करणाऱ्या डाॅ. गंधे याचा तुरुंगातील मुक्काम वाढला - Dr. who performed illegal abortions. Gandhe's prison term increased | Politics Marathi News - Sarkarnama

बेकायदा गर्भपात करणाऱ्या डाॅ. गंधे याचा तुरुंगातील मुक्काम वाढला

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 4 जुलै 2020

डाॅ. गंधे याने यापूर्वी केव्हापासून व किती महिलांचे गर्भपात केले, याबाबत पोलिस तपास घेत आहेत. अशा गुन्ह्यात असे रुग्ण शोधून कमिशनवर काम करणारे लोक असतात. त्यामध्ये काही डाॅक्टरांचाही समावेश असू शकतो.

नगर : बेकायदेशिर मार्गाने गर्भपात करणाऱ्या जखणगाव येथील गंधे हाॅस्पिटलचे संचालक डाॅ. सुनील उर्फ शंकरप्रसाद गंधे याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. 

नगर शहरापासून जवळच असलेल्या जखणगाव (ता. नगर) येथे डाॅ. सुनील उर्फ शंकरप्रसाद गंधे हा बेकायदा गर्भपात करीत होता. त्याने नगर जिल्ह्यासह बीड, औरंगाबाद आदी जिल्ह्यात जाळे विणले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 22 जूनला त्याचा पर्दाफाश केला होता. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी डाॅ. गंधे याला अटक केली. त्याने जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर जिल्हा व सत्र न्यायालयात काल युक्तिवाद करण्यात आला. त्यावर सरकार पक्षाचा युक्तीवाद लक्षात घेवून डाॅ. गंधे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले. जामीन अर्ज फेटाळल्याने गंधे याचा तुरुंगातील मुक्काम अधिक वाढला आहे.

डाॅ. गंधे याने समाजसेवेच्या नावाखाली समाजात प्रतिष्ठा मिळविली होती. विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून तो प्रबोधन करीत असे. लाॅकडाऊनच्या काळातही त्याने एकीकडे प्रबोधन केले, तर दुसरीकडे असे बेकायदेशीर गर्भपात करण्याचे प्रकार केले, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

त्याची `टीम` केव्हा पकडणार

डाॅ. गंधे याने यापूर्वी केव्हापासून व किती महिलांचे गर्भपात केले, याबाबत पोलिस तपास घेत आहेत. अशा गुन्ह्यात असे रुग्ण शोधून कमिशनवर काम करणारे लोक असतात. त्यामध्ये काही डाॅक्टरांचाही समावेश असू शकतो. त्यामुळे ही संपूर्ण टीम पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. गंधे याच्याकडील नोंदी, त्याच्या मोबाईलचे संपर्क नंबर किंवा काॅलरेकार्डनुसार काही माहिती पोलिसांना मिळू शकेल. त्यामुळे या गु्न्ह्याशी संबंधित असलेल्या इतर गुन्हेगारांचाही पोलिस शोध घेत आहेत. 

बेकायदा गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर कारवाई व्हावी

दरम्यान, बेकायदा गर्भलिंग व गर्भपात करणाऱ्या अशा डाॅक्टरांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी समाजातून होत आहे. यापूर्वीही परळी येथील एका डाॅक्टराचे रॅकेट पोलिसांनी पकडले होते. त्या वेळी डाॅक्टर दाम्पत्यास सजा झाली होती. त्याच्या संपर्कातील इतर लोकांनाही त्याचा चांगलाच फटका बसला होता. आता डाॅ. गंधे याच्या टीममध्ये कोणकोण अडकणार, याबाबत वैद्यकीय क्षेत्रात उत्सुकता आहे. लवकरच यातील इतर आरोपीही पकडले जातील, असा विश्वास पोलिस व्यक्त करीत आहेत.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख