डाॅ. विखे पाटील यांच्याकडून नव्या वादाला फोडणी ! उडविली या मंत्र्यांची खिल्ली

कामांसाठी प्रत्येक वेळी दिल्लीला संरक्षण विभागात जावे लागते. ही कामे करण्यासाठी आता मलाच संरक्षणमंत्री व्हावे लागेल.
20200420_082159.jpg
20200420_082159.jpg

नगर : "जिल्ह्यातील तिनही नवे मंत्री आणि काही आमदार, आपण किती साधे आहोत, असा आव आणत आहेत. हे फक्त प्रसिद्धीसाठी दाखविले जाते. राज्याचा पैसा खाऊन तुम्ही संत असल्याचा आव आणता का? दुसऱ्याच्या मतदारसंघात येऊन ढवळाढवळ करीत कामाचे श्रेय घेतल्यास, मी तुमच्या मतदारसंघात येऊन तुमची पोलखोल करीन,'' असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला. 

नगर-जामखेड राष्ट्रीय मार्गाच्या कामाचे भूमिपूजन टाकळी काझी येथे काल डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते झाले. आमदार बबनराव पाचपुते, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संपत म्हस्के आदी उपस्थित होते. 

मलाच संरक्षणमंत्री व्हावे लागेल

विखे पाटील म्हणाले, की "नगरमधील बहुतांश विकासकामांसाठी केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याची परवानगी घ्यावी लागते. शहर व परिसरातील बहुतेक विकासकामे संरक्षण खात्याशी निगडित आहेत. के. के. रेंजचा प्रश्‍न, कॅंटोन्मेंट परिसराचा प्रश्‍न, उड्डाणपूल, जामखेड, पाथर्डी व सोलापूर रस्त्यांच्या कामासाठी प्रत्येक वेळी दिल्लीला संरक्षण विभागात जावे लागते. ही कामे करण्यासाठी आता मलाच संरक्षणमंत्री व्हावे लागेल,'' अशी मिस्कील टिप्पणी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली. 

जिल्ह्यातील तीन मंत्री

खासदार विखे पाटील यांनी तिनही मंत्र्यांची खिल्ली उडवत त्यांचा पोलखोल करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे काॅंग्रेसचे राज्यातील नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेनेत नुकतेच पक्षांतर झालेले मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते जयंत पाटील यांचे भाचे उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर विखे पाटील यांनी टीका केली आहे. सत्ताधारी तिनही पक्षांवर सोडलेल्या टिकास्त्रामुळे नवा वाद उद्भवणार आहे. 

खासदार विखे पाटील यांनी अहमदनगर मतदारसंघातून (दक्षिण) उमेदवारी केली, तेव्हाच दक्षिण नगरमधील नेत्यांनी जोरदार विरोध केला होता. नंतर मात्र तो मावळला. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजपला मिरची लागली. हातची सत्ता गेल्याने नेते हतबल झाले. त्यातूनच आरोपाच्या फैरी झडत आहेत. काॅंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीच्या विरोधात भाजप असे चित्र सध्या राज्यात तयार झाले आहे. नगर जिल्ह्यातून भाजपच्या वतीने विखे पाटील पितापुत्र सत्ताधाऱ्यांना विरोध करतात. इतर नेते मात्र शांत आहेत. आता खासदार विखे पाटील यांनी तिनही मंत्र्यांवर आरोप करून नवा वाद निर्माण केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com