डाॅ. कांकरिया प्रकरणात भाजपनेते शिवाजी कर्डिले निर्दोष - Dr. BJP leader Shivaji Kardile acquitted in Kankaria case | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

डाॅ. कांकरिया प्रकरणात भाजपनेते शिवाजी कर्डिले निर्दोष

मुरलीधर कराळे
गुरुवार, 10 डिसेंबर 2020
सर्व उपलब्ध पुरावे व साक्षीदार तपासून न्यायालयाने तीनही आरोपींची सबळ पुराव्याअभावी व साक्ष विश्‍वासार्ह नसल्याच्या कारणाने निर्दोष मुक्तता करण्यात आली.

नगर : भिंगार येथील जमीन खरेदी व पिस्तुलाने धाक दाखविल्याप्रकरणी शहरातील डॉ. प्रकाश कांकरिया यांना फसविणे व धमकावल्याप्रकरणी माजी आमदार शिवाजी कर्डिले तसेच प्रकाश कर्डिले व अनिल कर्डिले यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आले होते. या प्रकरणावर जिल्हा व सत्र न्यायालयात आज सुनावणी झाली. यात तीनही आरोपींची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी व साक्ष विश्‍वासार्ह नसल्याच्या कारणाने निर्दोष मुक्तता केली आहे.

नगरमधील नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांनी भिंगारजवळ 23 एकर जमीन खरेदी करण्यासाठी सुमारे 92 लाख रुपये शिवाजी व प्रकाश कर्डिले यांना दिले होते. मात्र शिवाजी व प्रकाश कर्डिले यांनी ही जमीन दुसऱ्यांनाच विकल्याचे निर्दशनास आले असल्याचे डॉ. कांकरिया यांचा दावा होता. या संदर्भात शिवाजी कर्डिले यांच्या घरी जाऊन डॉ. कांकरिया यांनी विचारणा केली असता शिवाजी कर्डिले यांनी पिस्तूल दाखवून धमकावले. या वेळी प्रकाश कर्डिले हेही तेथे उपस्थित होते. प्रकाश कर्डिले यांचा मुलगा अनिल कर्डिले हे पुरावे नष्ट करण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना पकडले, असा आरोप कांकरिया यांनी ठेवला होता.

या प्रकरणावर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यात कांकरिया यांच्याकडून ऍड. प्रकाश कोठारी यांनी बाजू मांडली. शिवाजी कर्डिले यांच्याकडून ऍड. विश्‍वासराव आठरे पाटील यांच्यासह ऍड. रघुनाथ मुरुमकर, तर प्रकाश व अनिल कर्डिले यांच्याकडून ऍड. सुधीर बाफना यांनी बाजू मांडली. सर्व उपलब्ध पुरावे व साक्षीदार तपासून न्यायालयाने तीनही आरोपींना सबळ पुराव्याअभावी व साक्ष विश्‍वासार्ह नसल्याच्या कारणाने निर्दोष सोडले.

दरम्यान, हा खटला महाराष्ट्रात गाजला होता. नगर जिल्ह्यात याबाबत अनेक दिवस चर्चा सुरू होती. 2011 मध्ये याबाबत भिंगार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. कर्डिले यांनी पिस्तुलाचा धाक दाखविल्याचा आरोप ठेवून डाॅ. कांकरिया यांनी तक्रार दिली होती.

राजकारणातून अड़कविण्याचा प्रयत्न होता

राजकीय व्यक्तींना विविध प्रकरणात अडकविण्याचा काही लोकांकडून प्रयत्न होत असतो. असाच प्रकार माझ्याबाबतीत झाला. राजकारणातून मला अड़कविण्याचा प्रयत्न होत होता. परंतु न्यायदेवतेवर आपला विश्वास आहे. न्यायालयाने योग्य तो न्याय दिला आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख