कोल्हार बुद्रुकची ग्रामपंचायत यंदा बिनविरोध नकोच ! कार्यकर्त्यांचे विखे पाटील यांना साकडे - Don't reject Kolhar Budruk's Gram Panchayat without opposition this year! Urge MLA Vikhe Patil | Politics Marathi News - Sarkarnama

कोल्हार बुद्रुकची ग्रामपंचायत यंदा बिनविरोध नकोच ! कार्यकर्त्यांचे विखे पाटील यांना साकडे

सुहास वैद्य
बुधवार, 23 डिसेंबर 2020

विखे पाटील भाजपचे नेते असून, मी त्याच पक्षात आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत सहमतीच्या नावाखाली विखे पाटील यांनी गावात एकोपा राहण्यासाठी व गावाचा विकास खुंटू नये म्हणून विरोधकांना संधी दिली होती.

कोल्हार : राहाता तालुक्यातील प्रमुख ग्रामपंचायतीमध्ये गणल्या जाणाऱ्या कोल्हार बुद्रुकची निवडणूक यंदा बिनविरोध नकोच, असा आग्रह कार्यकर्त्यांनी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना धरला आहे. त्यामुळे गेली दहा वर्ष सलग बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतिच्या निवडणुकीत या वेळी सहमती एक्सप्रेस धावणार की थांबणार? याविषयी गावकर्यांमध्ये उस्तुकता निर्माण झाली आहे.

आमदार विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक काल कृषिभूषण राजेंद्र कुंकूलोळ यांच्या वस्तीवर झाली. तीत निवडणूक लढविण्याचा आग्रही भूमिका मांडण्यात आली. भाजपचे कार्यकर्ते व माजी सरपंच डॉ. संजय खर्डे हे या निवडणुकीत विखे गटातून सक्रीय झाले आहेत.

ते म्हणाले, की विखे पाटील भाजपचे नेते असून, मी त्याच पक्षात आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत सहमतीच्या नावाखाली विखे पाटील यांनी गावात एकोपा राहण्यासाठी व गावाचा विकास खुंटू नये म्हणून विरोधकांना संधी दिली होती. परंतु त्यांनी संधीचे सोने करण्याऐवजी गावाची दुर्दशा केली. गावाच्या विकासाऐवजी स्वतःचेच हित पाहिले. त्यामुळे या वेळी लोकभावनेतून निवडणूक घेण्यास भाग पाडीत आहोत. कार्यकर्ते आपला पॅनल सक्षमतेने लढवून बहुमताने विजयी`होतील, याची खात्री आहे.

प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष अशोक आसावा म्हणाले, की निवडणुकीबाबत श्रेष्ठींनी गावपातळीवर निर्णय घेण्याचे ठरविले आहे. याचा अर्थ सहमती थांबली, असे म्हणता 
येणार नाही. निवडणूक झालीच पाहिजे, असा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. गावाचे काही प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने एकजुटीने काम करता येईल. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जात आहोत. यात वेगळा उद्देश नाही.

प्रवरा बँकेचे संचालक अॅड. उदय खर्डे म्हणाले, की गावाचे प्रश्न विखे पाटील भरीव निधी आणतात. परंतु त्याचा वापर गावपातळीवर झाला नाही. मागील पाच वर्षात ग्रामपंचायत गावाला पुरेसे पाणी देऊ शकली नाही. हे दुर्दैव आहे. पंचायतीवर सक्षम नेतृत्व आले पाहिजे, अशी पदाधीकाऱ्यांपेक्षा जनतेची इच्छा होती. म्हणून आम्ही निवडणूक लढविण्याचे ठरविले व त्यास आमदारांनी संमती दिली आहे. ते 
निर्णय देतील, त्यावर ठाम राहू व ते उमेदवार देतील, त्यांना निवडून आणू. या वेळी भाऊसाहेब र. खर्डे, राजेंद्र कुंकूलोळ, पंचायत समिती सदस्य भारत अंत्रे, उपसरपंच ज्ञानेश्वर खर्डे, स्वप्नील निबे, संजय शिंगवी व संभाजी देवकर उपस्थित होते. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख