Don't peek into someone else's house! Phalke retaliates against Shinde | Sarkarnama

दुसऱ्याच्या घरात डोकावू नका ! फाळके यांचा शिंदे यांच्यावर पलटवार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 जून 2020

आमदार रोहित पवार यांच्यावर आरोप करताना शिंदे यांनी फाळके यांचे नाव पुढे करून सुंदोपसुंदी लावण्याचा प्रयत्न केला, असे राजकीय विश्‍लेषक सांगतात.

नगर : ""राम शिंदे यांनाच आमदारकीसाठी शिफारशीची गरज आहे, मला नाही,'' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी आज माजी मंत्री व भाजपचे मंत्री राम शिंदे यांच्यावर पलटवार केला. 

राम शिंदे यांनी सोमवारी "फाळके यांना विधान परिषदेवर घ्या; विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्याचे स्वागतच करू,' असे म्हटल्याने राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. आमदार रोहित पवार यांच्यावर आरोप करताना शिंदे यांनी फाळके यांचे नाव पुढे करून सुंदोपसुंदी लावण्याचा प्रयत्न केला, असे राजकीय विश्‍लेषक सांगतात. त्यावर फाळके यांनी लगेच प्रतिक्रिया देऊन कडवट उत्तर दिले.

फाळके म्हणाले, ""शिंदे यांनाच आमदारकीसाठी शिफारशीची गरज आहे, मला नाही. कारण, माझे नेते ठरवतील माझे काय करायचे ते. त्यांना वाटत होते, विधानसभा पराभवानंतर विधान परिषदेवर वर्णी लागेल; मात्र वर्णी लांब राहिली. साधे नावही चर्चेत आले नाही. त्यांना ते दुःख आहे. दुसऱ्याच्या घरात डोकावून काही फायदा होणार नाही.'' 

फाळके म्हणाले, की आमदार रोहित पवार यांचे काम जिल्ह्यातच नाही, तर राज्यात एक नंबर आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी कर्जत-जामखेडच नाही, तर राज्यासाठी काय काम केले? तुम्ही नेमके कुठे होता, याचीही माहिती लोकांकडे आहे. जामखेड हॉटस्पॉट झाले, राशीनला रुग्ण सापडले, त्या वेळी तुम्हाला जनतेची आठवण का आली नाही? आता कुठेच काही डाळ शिजत नाही म्हणून उपोषणाचा स्टंट करायचा आणि भांडणे लावायची. अशाने काही होणार नाही. माझी निष्ठा पवार घराण्याशी आणि पक्षाशी आहे. तुमची शिफारस जर शुद्ध हेतूने असती, तर तिचे स्वागतच होते; परंतु आपल्या राजकारणासाठी दुसऱ्याच्या पक्षात काड्या घालायचे सोडून द्या, असा सल्लाही फाळके यांनी राम शिंदे यांना दिला. 

"जेवण करून उपोषण!' 

""राम शिंदे यांनी आवर्तनाची तारीख जाहीर झाल्यानंतर उपोषण करून स्टंट केला आहे. सकाळी जेवण करून यायचे आणि तासाभरानंतर उपोषण सोडायचे, हा स्टंट नाही तर काय आहे? त्यांनी एक सांगावे, ते आमदार होते. मंत्रीही झाले. त्यांच्या काळात जामखेड आणि चौंडीला किती वेळा पाणी मिळाले? नदीकाठच्या आणि "टेल'च्या लोकांना हे सगळे माहीत आहे. आमदार रोहित पवार नाही, तर तुम्ही बनवाबनवी करीत आहात.'' असा टोलाही फाळके यांनी लगावला. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख