झालं गेलं गंगेला मिळालं ! विजयी उमेदवाराने भरविले पराभूत उमेदवाराला पेढे - Done, Ganga got it! The winning candidate pays the losing candidate | Politics Marathi News - Sarkarnama

झालं गेलं गंगेला मिळालं ! विजयी उमेदवाराने भरविले पराभूत उमेदवाराला पेढे

विनायक दरंदले
मंगळवार, 19 जानेवारी 2021

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी फार पूर्वीपासून सोनईत ही परंपरा आपल्या कार्यकर्त्यांच्या मनात रुजवली आहे.

सोनई : येथील ग्रामपंचायतीची निवडणूक दोन्ही गटांनी प्रचंड चुरशीने लढली. आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली. वादविवाद झाले. निवडणुकीतील विजयासाठी प्रत्येक उमेदवारानेच सर्वस्व पणाला लावले. अखेर मतदान झाले. मतमोजणी होऊन काहींच्या गळ्यात विजयमाला पडली, तर काहींना पराभव चाखावा लागला. निवडणूक संपली, वाद संपला. आता गावाच्या विकासासाठी एकत्र येऊ, हा विचार घेऊन जगदंब मंडळाच्या विजयी उमेदवारांनी पराभूत उमेदवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेत आभार मानले. झालं गेलं गंगेला मिळालं..

 

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी फार पूर्वीपासून सोनईत ही परंपरा आपल्या कार्यकर्त्यांच्या मनात रुजवली आहे. साखर कारखाना, सेवा संस्था, ग्रामपंचायत असो वा अन्य निवडणुका, निकाल जाहीर होताच, विजयी उमेदवार हे पराभूत उमेदवार व विरोधी गटाचे प्रमुख, ज्येष्ठ कार्यकर्त्यांची भेट घेतात. त्यांना धन्यवाद देतात. आभार व्यक्त करतात. तसेच बिनविरोध विजयी उमेदवारही अर्ज मागे घेणाऱ्या इच्छुकांना भेटून त्यांचे आभार मानत आले आहेत. 

गडाख यांनी पाडलेला चांगला पायंडा जगदंब मंडळाच्या उमेदवारांनी यंदाही पाळला. जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या सुचनेनुसार, मंडळाच्या विजयी 16 उमेदवारांनी आज आपआपल्या प्रभागात जाऊन पराभूत उमेदवारांची भेट घेत त्यांचे आभार मानले. विकासकामांबाबत आपल्या सुचनांना नेहमीच अग्रक्रम देऊ, अशी ग्वाही दिली. प्रभाग तीनमधील विजयी उमेदवार सविता अंबादास राऊत यांनी पराभूत उमेदवार अनिता खेसमाळसकर यांना पेढा भरवून स्वागत केले. श्वेताली दरंदले, सुरेखा पवार, विद्या दरंदले व इतर उमेदवारांनीही हाच कित्ता आपल्या प्रभागात गिरविला. त्यामुळे पराभूत उमेदवारांच्याही चेहऱ्यावर हास्य उमटले. या उपक्रमाचे महाराष्ट्रातून काैतुक होत आहे. 

पराभव स्विकारतो

लोकशाहीचा आदर म्हणून आमच्या ग्रामविकास मंडळाने सर्व जागा लढविल्या. आमचा एक उमेदवार विजयी झाला. काहींचा थोड्या मताने पराभव झाला. हा पराभव स्वीकारत असून, विजयी उमेदवारांबाबत कुठलाही राग, द्वेष नाही. 
- प्रकाश शेटे, ग्रामविकास मंडळ प्रमुख 

आता सगळेच आपले

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची शिकवण व मंत्री गडाख यांची आपलेपणाची भूमिका लक्षात ठेवून आजपर्यंत काम केले. निकाल लागला, आता सगळेच आपले, म्हणून हा उपक्रम राबविला. 
- सविता राऊत, विजयी उमेदवार, सोनई 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख