नगर : ``जलसंधारणमंत्री जयंत पाटील तुमचे मामा आहेत. मामांकडून तेवढे निळवंडे कालव्याचे काम करून घ्या. तुमची पाठ थोपटीन,`` असा सल्ला आज भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांना दिला.
राहुरी तालुक्यातील एका कार्यक्रमात कर्डिले यांनी तनपुरे यांच्यावर टीकेची झोड उठविली. गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात बनावट डिझेलप्रकरण गाजत आहे. त्यामध्ये राहुरी येथील राष्ट्रवादीचा कार्य़कर्ता आरोपी निघाला आहे. हे सिद्ध होण्याच्या आधीच कर्डिले यांनी संबंधित प्रकरणी तनपुरे यांचा आरोपींना आशिर्वाद असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर संबंधित आरोपी निश्चित झाल्यानंतरही त्याला राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे पाठबळ असल्याचे म्हटले होते. त्यावर तनपुरे यांनी कर्डिले यांचा समाचार घेताना विविध आरोप केले होते. आज कार्यक्रमात कर्डिले यांनी तनपुरे यांना खरमरीत शब्दांत उत्तर दिले. बनावट डिझेलप्रकरणी मुख्य आरोपीला पाठिशी घालण्याचे काम तनपुरे यांनी केले, असा टोला कर्डिले यांनी लगावला.
कर्डिले म्हणाले, की मला गुंड म्हणणारे स्वतः महागुंड आहेत. गुंडांना पाठिशी घालणारे महागुंड ठरले आहेत. त्यांनी आमच्यावर आरोप करण्याआधी स्वतःच्या चार बोटांकडे पहावे. स्वतः वीजमंत्री असताना जिल्ह्यात विजेचे अऩेक प्रश्न आहेत. रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असणाऱ्या आॅईलचा तुटवडा झाल्याने शेतकऱ्यांना विजेपासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. किमान आपल्या जिल्ह्यातील विजेचा प्रश्न त्यांनी सुरळीत करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कर्डिले म्हणाले, की निळवंडेच्या कालव्यांचे काम रखडले आहे. तुमचे मामा जलसंधारणमंत्री आहेत. त्यांच्याकडून हे काम करून घ्या. असे झाल्यास मी तुमची पाठ थोपटीन, असे आव्हान कर्डिले यांनी तनपुरे यांना दिले.
महाराष्ट्रातही विजेचे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सध्या वीजबिलाप्रश्नी आंदोलने सुरू आहेत. विजमंत्र्यांनी त्या प्रश्नांचा आधी निपटारा करावा. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत. बिले दुरुस्त करून द्यावेत. चुकीचे बिले देऊन सरकार काय साध्य करणार, असा प्रश्न कर्डिले यांनी उपस्थित केला.

