Do quality work otherwise face action | Sarkarnama

दर्जेदार कामे करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 7 मे 2020

कामांची मंजुरी आणली असून, निधीही वर्ग झाला आहे. त्यामुळे आता संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी दर्जेदार कामे करावीत, अन्य़था कारवाईला सामोरे जावे लागेल.

नगर : कोरोनाशी लढाईत प्रशासनाने सरकारला चांगले सहकार्य केले. लाॅक डाऊननंतर विविध विकास कामे सुरू होतील. या कामांची मंजुरी आणली असून, निधीही वर्ग झाला आहे. त्यामुळे आता संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी दर्जेदार कामे करावीत, अन्य़था कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला आहे.

दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मंजूर असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाची पाहणी आमदार जगताप यांनी केली. या वेळी त्यांनी अधिकारी व ठेकेदारांना त्यांनी फैलावर घेतले.
कोरोना या संसर्ग विषाणूमुळे मानवी जीवनावर विपरित परिणाम झाला आहे. त्याचबरोबर आपल्यावर आर्थिक संकटही ओढवले आहे. या अडचणीच्या काळात सर्वांनी सरकारला सहकार्य करावे. सरकारच्यावतीने शहरामध्ये विविध विकासकामे मंजूर आहेत. या कामांसाठी निधी वर्ग झाला आहे. महापालिका प्रशासनाने ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावी. विकासाची कामे दर्जेदार व्हावी, यासाठी प्रशासनाने या कामावर लक्ष केंद्रीत करावे. ठेकेदारांनीही उत्कृष्ट दर्जाची कामे करावीत, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल. स्टेशनरोड परिसरामध्ये विविध विकास कामे मंजूर करुन आणली व आज ती कामे पूर्ण झाली आहेत. सीना नदीवरील पुलाच्या कामासाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे ते काम आज पूर्ण मार्गी लागले आहे. कायनेटीक चौक ते मल्हार चौकपर्यंतच्या रस्त्याची कामे पूर्ण केली आहेत. यश पॅलेस हॉटेल ते रेल्वेस्टेशनपर्यंतच्या रस्त्याची कामे पूर्ण केली आहेत. याचबरोबर या भागातील विविध विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. माजी नगरसेवक विजय गव्हाणे यांनी विविध विकासकामांसाठी नेहमीच पाठपुरावा केल्यामुळे ही कामे मार्गी लागली, असे जगताप यांनी सांगितले.

हेही वाचा...
झेडपीमध्ये "थर्मल स्कॅनर' कार्यान्वित! 

राज्य सरकारने लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण 33 टक्‍क्‍यांपर्यंत वाढविले आहे. प्रत्येक कार्यालयात सामाजिक अंतर व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद मुख्यालयात अधिकारी- कर्मचाऱ्यांसह अभ्यागतांसाठी थर्मल स्कॅनरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याद्वारे प्रत्येकाचे तपासणी केली जात आहे. 
मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्यवस्था सुरू झाली आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात जिल्हा परिषद यंत्रणा रात्रंदिवस योगदान देत आहे. विशेषत: ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात जिल्हा परिषद संवर्गातील कर्मचारी सक्रिय आहेत. जवळपास 45 हजार कर्मचारी गावपातळीवर काम करीत आहेत. त्याच वेळी सरकारने तिसऱ्या लॉकडाउनमध्ये ऑरेंज, ग्रीन झोनमधील जिल्ह्यांत शासकीय कार्यालयांत 33 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती मंजूर केली आहे. 
शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद कर्मचारी रुजू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यालयात पूर्ण काळजी घेण्यात येत आहे. अधिकारी- कर्मचाऱ्यांसह अभ्यागतांचे थर्मल स्कॅनिंग यंत्रणेद्वारे तपासणी करण्यात येत आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख