दिवाळी, पाडवा, भाऊबीज गेली, आदिवासींची `खावटी` कागदावरच राहिली - Diwali, Padwa is gone, the `khawti` of the tribals remains on paper | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

दिवाळी, पाडवा, भाऊबीज गेली, आदिवासींची `खावटी` कागदावरच राहिली

शांताराम काळे
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

लॉकडाऊन झाल्याने सर्वांचाच रोजगार हिरावला आहे. या काळात रोजंदारीवर काम करणाऱ्या आदिवासींच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला.

अकोले : गेले आठ महिने होऊनही आदिवासींच्या हातात खावटी मिळत नाही. दसरा गेला, दिवाळी गेली, ओवाळीही संपली आता आदिवासींच्या सहनशीलतेचा सरकारने अंत पाहू नये, असा इशारा माजी आमदार व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राज्याचे अध्यक्ष वैभव पिचड यांनी दिला आहे. 

याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. त्यात पिचड यांनी म्हटले आहे, की आदिवासी विकास विभाग व सरकारच्या निष्क्रिय कार्यपद्धतीबाबत आदिवासींमध्ये असलेल्या संतापाचे आणि नैराश्याचे प्रतीक आहे. आज आदिवासी विकास मंत्र्यांनी आणि या पूर्ण विभागानेच आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. आदिवासींच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याची चूक आदिवासी विकासमंत्री करीत असून, हे दुर्दैवी आणि तीव्र आंदोलनाला आमंत्रण देणारा प्रकार आहे, असे सूचक वक्तव्य   त्यांनी केले. 

लॉकडाउन काळात आदिवासींना दिलासा मिळेल, या अपेक्षेने पाठपुरावा, सर्व मार्ग वापरून लढा दिला, तदनंतर शासनाने आदिवासींना खावटी देण्याचे जाहीर केले, मात्र आज लॉकडाऊन होऊन ८  महिने उलटून गेले, तरी शासन कागदी घोडे नाचवत असल्याने आदिवासींची खावटी ही कागदावरच राहिली आहे. या लॉकडाऊन काळात आदिवासी उपाशी मरत असताना आदिवासी विकास विभागाने एकही रुपया आदिवासींना जगविण्यासाठी प्रकल्प कार्यालयांना दिला नाही, असा आरोप पिचड यांनी केला आहे.

मार्च -२०२० मध्ये लॉकडाऊन झाल्याने सर्वांचाच रोजगार हिरावला आहे. या काळात रोजंदारीवर काम करणाऱ्या आदिवासींच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी या प्रश्नावर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राज्य अध्यक्ष वैभव पिचड यांनी आवाज उठविला. दिवाळीमध्ये खावटी मिळणे आवश्यक असताना आदिवासी विकास कर्मचारी, शिक्षकांना दिवाळीत सर्व्हे व फॉर्म भरण्यास सांगितले, मात्र कर्मचाऱ्यांची दिवाळी नाही व लाभार्थ्यांची ही दिवाळी नाही, असे नियोजन सरकार करत असून, गरीब, कष्टकरी, उपेक्षित, विधवा, अंध, अपंग आदिवासींची चेष्टा करत आहे, असे पिचड यांनी निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील आदिवासींना तातडीने खावटी कर्ज मिळावे, अशी मागणी राज्यभरातून होत आहे. केवळ आश्वासने देऊन चालणार नाही, तर आदिवासींना मदत मिळावी, अशी मागणी आदिवासी समाजातून होत आहे.

Edited By - Murlidhar Karale
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख