जिल्हा बॅंकेबाबत संगमनेरमध्ये खलबते ! थोरातांच्या बैठकिस भाजपचेही नेते - Disturbed in Sangamner about District Bank! Thorat's meeting was also attended by BJP leaders | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्हा बॅंकेबाबत संगमनेरमध्ये खलबते ! थोरातांच्या बैठकिस भाजपचेही नेते

मुरलीधर कराळे
रविवार, 24 जानेवारी 2021

भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसंदर्भात थोरात यांना भेटण्यासाठी जिल्ह्यातील दिग्गजांची हजेरी चर्चेचा विषय ठरली आहे.

नगर : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काल संगमनेर येथील भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर कॉंग्रेसचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या वेळी काॅंग्रेस नेत्यांबरोबरच राष्ट्रवादी कॉॅंग्रेस, भाजपचे दिग्गजही उपस्थित होते. त्यामुळे बैठकीत काय खलबते झाली, याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. 

भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसंदर्भात थोरात यांना भेटण्यासाठी जिल्ह्यातील दिग्गजांची हजेरी चर्चेचा विषय ठरली आहे.

संगमनेरमध्ये महसूलमंत्री थोरात यांच्या भेटीसाठी भाजपचे नेते माजी मंत्री शिवाजी कर्डिले, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, माजी आमदार वैभव पिचड, राष्ट्रवादीचे नेते राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार अरुण जगताप, माजी आमदार राहुल जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले, आमदार आशुतोष काळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे, तसेच इतर नेते उपस्थित होते. 

जिल्हा बॅंकेत सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाची सत्ता आहे. या बॅंकेच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका असलेले सहकारातील ज्येष्ठ नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील विभक्त होऊन दोन स्वतंत्र पक्षांत काम करीत आहेत. बॅंकेच्या निवडणुकीच्या रिंगणात ते आपापल्या पक्षांच्या माध्यमातून सक्रिय झाले आहेत, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी, कॉंग्रेस व भाजप असा सामना रंगणार आहे. भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे, तर थोरात यांनी भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीची मोट बांधली आहे. 

ज्येष्ठ नेते शरद पवार व बाळासाहेब थोरात कार्यक्रमाच्या निमित्ताने रविवारी जिल्ह्यात एकत्र येत असल्याने, या दौऱ्यात जिल्हा बॅंकेची रणनीती ठरण्याची शक्‍यता आहे. बॅंकेतील 21 पैकी 14 जागा सेवा संस्था मतदारसंघाच्या आहेत. त्यांवर बहुतांश ठिकाणी कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. ते टिकविण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील राहणार आहे. 

समविचारी नेत्यांना बरोबर घेणार ः थोरात 

सहकाराची परंपरा जपताना स्वच्छ व पारदर्शक कारभारासाठी संबंधित व्यक्तीचा सहकाराविषयीचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या या बॅंकेचा कारभार करताना सहकाराची उज्ज्वल परंपरा टिकणे गरजेचे आहे. व्यक्ती कोणत्या पक्षाची आहे, यापेक्षा किती चांगले काम करते, याला महत्त्व देणार असल्याचे मंत्री थोरात यांनी या बैठकीत सांगितले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख