लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास ! म्हैसगावमध्ये ग्रामसभेत मतदान सुरू - Distrust on publicly appointed sarpanch! Voting starts in Gram Sabha | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास ! म्हैसगावमध्ये ग्रामसभेत मतदान सुरू

विलास कुलकर्णी
बुधवार, 2 डिसेंबर 2020

लोकनियुक्त सरपंच यांना हटवायचे की, कायम ठेवायचे. याचा सर्वोच्च अधिकार ग्रामसभेला मिळाल्याने निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.

राहुरी : म्हैसगाव येथे लोकनियुक्त सरपंच महेश गागरे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्तावावर विशेष ग्रामसभा घेण्यात आली. नंतर, जिल्हा परिषद शाळेतील चार मतदान केंद्रांवर शांततेत गुप्त मतदान प्रक्रिया सुरू झाली. एक हजारावर मतदारांनी रांगा लावल्या. सायंकाळपर्यंत निकाल जाहीर होणार आहे.

लोकनियुक्त सरपंच यांना हटवायचे की, कायम ठेवायचे. याचा सर्वोच्च अधिकार ग्रामसभेला मिळाल्याने निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. यापूर्वी अशा प्रकारचे मतदान महाराष्ट्रात एका ठिकाणी झाल्याचे समजते. नगर जिल्ह्यात मात्र अशा पद्धतीचे पहिलेच मतदान होत आहे.

म्हैसगाव येथे आज (बुधवारी) सकाळी नऊ वाजता तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा सुरू झाली. गटविकास अधिकारी गोविंद खामकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके उपस्थित होते. 

सभेसमोर बोलतांना तहसीलदार शेख म्हणाले, "ग्रामपंचायत सदस्यांनी २३ ऑक्टोबर रोजी तीन चतुर्थांश बहुमताने सरपंच गागरे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर केला.  मतपत्रिकेत पहिल्या क्रमांकावर "अविश्वास प्रस्तावाला माझी संमती आहे." दुसऱ्या क्रमांकावर "अविश्वास प्रस्तावाला संमती नाही." असा उल्लेख केला आहे. त्या समोरील चौकोनात बाणफुलीचा शिक्का मारून, मतदान करायचे आहे. तत्पूर्वी, मतदान यादीनुसार नाव नोंदणी करून, चिठ्ठी घेऊन, मतदान केंद्रात प्रवेश करावा." असे आवाहन केले.

सकाळी साडेदहा वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मतदान केंद्र समोर ग्रामस्थांनी रांगा लावल्या. सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. महिला, वृद्ध व अपंग मतदारांनी मतदान केले. मतपत्रिकेवर चिन्ह नसल्याने, मतदान करतांना निरक्षर मतदार गोंधळले. त्यांनी दिसेल त्या चौकोनात शिक्का मारून, मतदानाचा हक्क बजावला."

लोकनियुक्त सरपंच गागरे यांनी सरपंचपद अबाधित राहील. जनतेचा चांगला प्रतिसाद आहे. असा विश्वास व्यक्त केला. तर, उपसरपंच सागर दुधाट यांनी सरपंच यांच्या निष्क्रिय कारभारामुळे अविश्वास प्रस्ताव आणला. ग्रामसभेत मतदार सरपंचाविरुद्ध मतदान करतील, असा विश्वास व्यक्त केला.

"एकुण २२७७ मतदार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी १५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. २० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. दुपारी तीन वाजता मतमोजणी सुरू होईल. सायंकाळी पाच वाजेपर्यंत निकाल जाहीर होणार आहे. सरपंचपद रद्द झाले. तर, सदस्यांमधून सरपंच निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया होईल." अशी माहिती तहसीलदार शेख यांनी दिली.

दरम्यान, या आगळ्या वेगळ्या मतदानप्रक्रियेकडे महारा्ट्रातील सरपंचांचे लक्ष लागले आहे.
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख