District Collector's concept is heavy, farmers will avoid crop loans | Sarkarnama

जिल्हाधिकाऱ्यांची संकल्पना भारी, पिककर्जासाठी टळणार शेतकऱ्यांची वारी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 11 जून 2020

सध्या बॅंकांमध्येही मनुष्यबळाची कमतरता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये. यासाठी आॅनलाईन अर्ज देण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.

नगर : खरीप हंगामासाठी पीक कर्ज घेताना सेवा संस्था किंवा बॅंकांमध्ये हेलपाटे मारण्याची आता गरज पडणार नाही. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यां संकल्पनेतून मोबाईल अॅपच्या माध्यमातून आता पीक कर्ज घेता येणार आहे. 

जिल्ह्यात खरीप पिकाच्या कर्जासाठी शेतकऱ्यांना सेवा संस्थेत हेलपाटे मारावे लागतात. गावातील छोट्याशा कार्यालयात होणारी गर्दी पाहता कोरोनाचा संसर्गही वाढण्याची शक्यता असते. याबरोबरच तासंतास उभे राहण्यात शेतीच्या कामाचा वेळही वाया जातो. सध्या डिजिटलच्या सुविधा सर्वत्र उपलब्ध असून, बहुतेक शेतकऱ्यांकडे अॅन्ड्राईड मोबाईल आहेत. त्यामुळे त्यांना अॅप डाऊनलोड करून पिक कर्जासाठी अर्ज करणे शक्य आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या संकल्पनेतून मोबाईलवरून आॅनलाईन प्रणाली तयार करण्यात आली आहे.

सध्या बॅंकांमध्येही मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे बॅंकांच्या कामावर परिणाम होत आहे. कोरोनामुळे सर्व कर्मचारी उपस्थित करता येणे शक्य नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये. यासाठी आॅनलाईन अर्ज देण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. संबंधित लिंक ahmednagar.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सेवा संस्था, बॅंकांतूनही मिळणार कर्ज

मोबाईल अॅपवरून कर्ज घेणे शक्य असले, तरी यापूर्वीची पद्धत असलेल्या सेवा संस्था किंवा बॅंकेतूनही कर्ज घेणे शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन्ही पद्धतीने कर्ज घेता येणार आहे. आॅनलाईन कर्ज मागणीच्या या निर्णयाचे तरुण शेतकरी वर्गातून स्वागत होत आहे. 

विक्रीसाठी आॅनलाईन व्यवस्थेची गरज

जिल्हाधिकाऱ्यांनी ज्याप्रमाणे कर्जसुविधा आॅनलाईन दिली, त्याप्रमाणे आता विक्रीची व्यवस्थाही करण्याची गरज शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. कारण बहुतेक शेतीमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांना शहरात जावे लागते. कोरोनाच्या धास्तीने ते जास्त वेळ बाजारपेठेत थांबू शकत नाहीत. बाजारपेठाही बंद असल्याने अनेकदा समस्यांना सामारे जावे लागते. लहान शेतकऱ्यांकडे जास्त माल उपलब्ध नसतो. मोठ्या शेतकऱ्यांकडे जास्त माल असल्याने ते थेट मोठ्या शहरात गाडी भरून पाठवितात. तेथे बाजारसमितीत विक्रीचे नियोजन होते. लहान शेतकऱ्यांना मात्र ते परवडत नाही. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांसाठी शेतीमाल विक्रीसाठी काही आॅनलाईन पद्धती विकसित करणे शक्य असेल, तर विचार व्हावा, अशी मागणी तरून शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख