जिल्हा बॅंकेच्या कर्जाचे राजकारण ! शेतकरी कर्जबाजारी की मदतीमुळे आधार - District Bank loan politics! Farmers lending support | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

जिल्हा बॅंकेच्या कर्जाचे राजकारण ! शेतकरी कर्जबाजारी की मदतीमुळे आधार

मुरलीधर कराळे
बुधवार, 9 डिसेंबर 2020

गेल्या वर्षभरात शेतकरी हतबल झाला आहे. कोरोनाच्या संकटामुळे भाजीपाल्याला दर मिळू शकला नाही. त्यामध्ये अतिवृष्टीचे संकट आले. त्यामुळे खरीप व रब्बीची पिके साधली नाहीत.

नगर : अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेने शेतकऱ्यांना खेळते भांडवल, गाोपालन आदी कारणांसाठी गेल्या काही दिवसांपासून दीड लाखांपर्यंत कमी व्याजदराने कर्ज दिले. भाजपचे माजी मंत्री तथा बॅंकेचे संचालक शिवाजी कर्डिले यांच्या पुढाकारातून कर्ज वाटप झाले. या कर्जाचे विरोधकांनी मात्र भांडवल केले. शेतकऱ्यांना अधिक कर्जाच्या खाईत लोटण्याचा हा प्रकार असल्याची टीका झाली. शेतकऱ्यांना नेमका मदत झाली, की तो कर्जबाजारी झाला, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला.

गेल्या वर्षभरात शेतकरी हतबल झाला आहे. कोरोनाच्या संकटामुळे भाजीपाल्याला दर मिळू शकला नाही. त्यामध्ये अतिवृष्टीचे संकट आले. त्यामुळे खरीप व रब्बीची पिके साधली नाहीत. साहजिकच शेतकरी अडचणीत सापडला. अशा परिस्थितीत त्याला आधार देण्यासाठी जिल्हा बॅंक पुढे आली. बॅंकेने खेळते भांडवलाच्या निमित्ताने दीड लाखांपर्यंत अत्यल्प व्याजदराने कर्ज दिले.

असाही शेतकरी कर्जबाजारी होताच

शेतकऱ्यांनी ही रक्कम कुठे वापरली, असा प्रश्न विरोधक विचारतात. दिलेल्या कारणासाठी ही रक्कम वापरली नसली, तरीही अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे कर्जबाजारी झालेलाच होता. खरीपासाठी हातउसणे पैसे घेऊन बहुतेक शेतकऱ्यांनी खते-बियाणे वापरली. हे पिक चांगले येईल, अशी आशा असताना अतिवृष्टीचे संकट आले. त्यामुळे हे कर्ज तसेच राहिले. हातउसणे पैसाचे रुपांतर सावकारी कर्जात झाले. कमीत कमी दोन टक्के महिन्याला अशा पद्धतीने व्याज देण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली. अशा परिस्थितीत जिल्हा बॅंकेने दिलेले कर्ज आधार ठरला. खासगी सावकारांचे, लोकांचे कर्ज परत करता आले. त्यामुळे कमी व्याजदरामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला.

शिवसेनेच्या आरोपात किती तथ्य

शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष (दक्षिण) प्रा. शशिकांत गाडे यांनी नुसतीच एका कार्यक्रमात कर्डिले यांच्यावर टीका करीत शेतकऱ्यांना कर्डिले यांनी आणखी कर्जबाजारी केले, असा आरोप केला. केवळ टीका करायची म्हणून विरोधक टीका करतात, असाच सूर त्यामागे निघाला. त्यामुळे शिवसेनेने केलेल्या आरोपात किती तथ्य आहे, हे शेतकऱ्यांनी पडताळून पाहिले. शिवसेना सत्तेत असताना केवळ श्रेय दुसऱ्याला जाऊ नये म्हणून अशा पद्धतीचे वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये, असेच मत शेतकऱ्यांचे बनले आहे.

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख