नगर तालुका : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदाची निवड 20 फेब्रुवारी होत आहे. या निवडणुकीसाठी माजी आमदार शिवाजी कर्डिले तिसऱ्यांदा नगर तालुक्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यापूर्वी दोन्ही टर्म ते बिनविरोध निवडून आले होते. यावेळी कर्डिले यांच्या विरोधात महाविकास आघाडीने कर्डिले यांच्या विरोधात उमेदवार देण्याचे नियोजन केले आहे. "तालुक्यातील 109 सेवा संस्थांपैकी 100 ठराव माझ्या बाजुने झाले असल्याचे आजचे चित्र तुमच्या डोळ्यासमोर आहे. याही वेळी जिल्हा बॅंकेत विजय माझाच होणार असल्याचे कर्डिले यांनी ठामपणे सांगितले. या वेळी त्यांनी आपल्या समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी ते तालुक्यातील उपस्थित सोसायटी मतदार संघातील मतदार व कार्यकर्त्यांसमोर बोलताना कर्डिले म्हणाले, की जिल्ह्यातील साखर कारखानदारांची असणारी जिल्हा बॅंक ही शेतकऱ्यांची बॅंक केली. खेळत्या भांडवलच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना आधार देत पशुधनासाठी तालुक्यात 140 कोटींचे कर्ज वाटप केले. 109 ठरावांपैकी 100 ठराव हे माझ्याबरोबर असल्याने माझा विजय पक्का असल्याचे सांगत गेल्या दहा वर्षांपासून बिनविरोध निवडून येत आहे. या पंचवार्षिकला विरोधकांना माझ्या विरोधात उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. तालुक्यात शेतकरी हितासाठी केलेल्या विकासकामांची पावती म्हणून दहा वर्षांपासून बिनविरोध निवडून येत आहे. जिल्हा बॅंकेत संचालक झाल्यापासून शेतकऱ्यांना गायी, म्हशी घेण्यासाठी, तर महिलांना लघुउद्योग चालू करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून अर्थ सहाय्य केले आहे.
महाआघाडीकडे फक्त नऊच सेवा संस्था शिल्लक राहिल्या आहेत, तरी सुध्दा कर्डिले यांना बिनविरोध निवडून येवू द्यायचे नाही म्हणून ते विरोधाला विरोध केल्याशिवाय राहणार नाहीत, असा हल्लाबोल केला.
या वेळी विमल आव्हाड, नाथा पालवे, अभिलाष घिगे, संतोष म्हस्के, माधवराव लामखडे, दिलीप भालसिंग, संभाजी लोंढे, सुरेश सुंबे यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
Edited By - Murlidhar Karale

