जिल्हा बॅंक निवडणूक ! कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र येणार; भाजपचा सवता सुभा  - District Bank Election! Congress, NCP, Shiv Sena will come together; BJP's Savata Subha | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्हा बॅंक निवडणूक ! कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र येणार; भाजपचा सवता सुभा 

मुरलीधर कराळे
सोमवार, 18 जानेवारी 2021

राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही नुकतीच बैठक झाली. त्यात कॉंग्रेस व शिवसेनेशी युती करून भाजपचा सामना करण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे लवकरच या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होऊन अंतिम निर्णय होऊ शकतो.

नगर : अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष स्वतंत्र पॅनल उभा करण्याची शक्‍यता आहे. याबाबत नुकतेच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सूचक वक्तव्य केले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही बैठक होऊन रणनीती ठरविण्यात आली. त्यात शिवसेना व कॉंग्रेसला सोबत घेऊन राज्यातील आघाडी येथेही कायम ठेवण्याची तयारी सुरू असल्याचे समजते. त्यामुळे आगामी काळात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी या आघाडी विरुद्ध भाजप, अशी लढत होण्याची चिन्हे आहेत. 

जिल्हा बॅंकेच्या 21 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. खासदार डॉ. विखे पाटील यांनी एका कार्यक्रमात बॅंकेच्या निवडणुकीत भाजपने स्वतंत्र पॅनल करण्याची अपेक्षा व्यक्त केली. भाजपमध्ये ज्यांच्याकडे सध्या कोणतेही मोठे पद नाही, त्यांना संधी देण्यात यावी. तसेच जे सोबत येतील, त्यांनाही बरोबर घेऊ, असे सांगितले. त्यामुळे भाजपचा स्वतंत्र पॅनल होऊ शकतो. प्रसंगी विखे पाटील व माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्त्वाखाली स्वतंत्र पॅनल तयार होऊन बॅंकेची सत्ता काबिज करण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते. 

राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही नुकतीच बैठक झाली. त्यात कॉंग्रेस व शिवसेनेशी युती करून भाजपचा सामना करण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे लवकरच या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होऊन अंतिम निर्णय होऊ शकतो. राष्ट्रवादीचे नेते, तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, शिवेसेना नेते, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, कॉंग्रेस नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात याबाबत निर्णय घेणार आहेत. 

जिल्हा बॅंकेत पूर्वीपासून भाजपचे माजी मंत्री मधुकर पिचड, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे वर्चस्व राहिले आहे. विधानसभा निवडणुकीत पिचड यांनी "राष्ट्रवादी'ला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला. विखे पाटील यांनीही कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजप गाठले. त्यांच्यासह आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री राम शिंदे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यामुळे या निवडणुकीत भाजपची ताकद वाढली आहे. 

जिल्हा बॅंकेवर कायम कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सरशी राहिली. आता या दोन्ही पक्षातील नेतेच इतर पक्षात गेल्याने यंदाची निवडणूक चुरशीची होणार आहे. मंत्री गडाख शिवसेनेत गेल्याने, हा पक्षही निवडणुकीत ताकद लावणार आहे. मंत्री तनपुरे, आमदार नीलेश लंके, आमदार डॉ. किरण लहामटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांच्या तालुक्‍यांत या नेत्यांचीही भूमिका महत्त्वाची राहणार आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख