जिल्हा बॅंक निवडणूक ! भाजपचं ठरलं, स्वतंत्र पॅनल करणार, फडणवीसांच्या बैठकित निर्णय - District Bank Election! BJP decided to form an independent panel, decision of Fadnavis meeting | Politics Marathi News - Sarkarnama

जिल्हा बॅंक निवडणूक ! भाजपचं ठरलं, स्वतंत्र पॅनल करणार, फडणवीसांच्या बैठकित निर्णय

मुरलीधर कराळे
गुरुवार, 21 जानेवारी 2021

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी भाजपने यापूर्वीच तयारी सुरू केली आहे. खासदार विखे पाटील यांनी स्वतंत्र पॅनलचे संकेतही दिले होते. 20 फेब्रुवारी रोजी या बॅंकेच्या 21 संचालकांसाठी मतदान होणार आहे.

नगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वतंत्र पॅनल उभा करण्याचा निर्णय झाला आहे. मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकित यावर शिक्कामोर्तब झाले.

मुंबईतील फडणवीस यांच्या बंगल्यामध्ये मंगळवारी रात्री झालेल्या बैठकिस खासदार डाॅ. सुजय विखे पाटील, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री राम शिंदे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, माजी आमदार वैभव पिचड, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, महापाैर बाबासाहेब वाकळे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सिताराम गायकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे,  भाजपचे कार्यकारीणी सदस्य प्रा. भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी भाजपने यापूर्वीच तयारी सुरू केली आहे. खासदार विखे पाटील यांनी स्वतंत्र पॅनलचे संकेतही दिले होते. 20 फेब्रुवारी रोजी या बॅंकेच्या 21 संचालकांसाठी मतदान होणार आहे. त्यामध्ये सेवा संस्थांमधून 14, मागास प्रवर्गातून 1, महिला राखीवमधून 2, अनुसुचित जमाती 1, भटके विमुक्त 1, शेतीपूरक संस्था 1 व बिगरशेती संस्थांमधून 1 अशा संचालकांची निवड होणार आहे. 

पक्षाची ताकद वाढल्याने स्वतंत्र लढणार

नगर जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली आहे. मातब्बल नेते भाजपमध्येच आहेत. त्यामुळे जिल्हा बॅंकेची निवडणूक स्वतंत्र लढल्यास बॅंकेवर भाजपचीच सत्ता येईल, असे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावर फडणवीस यांनी स्वतंत्र लढण्याला ग्रीन सिग्नल दिला. याबाबतचे सर्व अधिकार फडणवीस यांना राहतील, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे आगामी काळात 21 जागांवर भाजप लढणार आहे.

भाजपमध्ये मातब्बर नेते आहेत. त्यामुळे जिल्हा बॅंकेवर भाजपची सत्ता आणणे सोपे होणार आहे. त्यामुळे भाजप स्वतंत्र पॅनल करणार असून, बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा देता येणार आहेत.
- प्रा. भानुदास बेरड, कार्यकारिणी सदस्य

बॅंकेच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र पॅनल करण्याचा आग्रह सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी धरला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बॅंकेवर भाजपचाच झेंडा फडकताना दिसेल.
- अरुण मुंडे, जिल्हाध्यक्ष
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख