Dissatisfied with not giving candidature to Ram Shinde and Pankaja Munde | Sarkarnama

नगर-बीडची `बाॅर्डर` अस्वस्थ ! भाजपमध्ये ज्वालामुखी खदखदतोय

मुरलीधर कराळे
सोमवार, 11 मे 2020

पक्षांतर्गंत `शत्रुत्त्व` संपविण्याच्या नादात परळीच्या `ताई`ला ओवाळणी दिलीच नाही. त्यामुळेच आता नगर-बीडच्या बाॅर्डवर भाजपअंतर्गत ज्वालामुखी खदखदतोय. केव्हाही उद्रेक होईल, अशी  स्थिती आहे.

नगर : जामखेड व पाथर्डी विधानसभा मतदारसंघ दोन्हीही बीडच्या सीमेवरील. तब्बल 25 वर्षे भाजपची एकहाती सत्ता असलेल्या जामखेड-कर्जतमध्ये पराभव होताच भाजपने `सरां`कडे दुर्लक्ष केले. त्यानंतर जवळ करील म्हणाले, परंतु उलट दूर फेकले. पक्षांतर्गंत `शत्रुत्त्व` संपविण्याच्या नादात परळीच्या `ताई`ला ओवाळणी दिलीच नाही. त्यामुळेच आता नगर-बीडच्या बाॅर्डवर भाजपअंतर्गत ज्वालामुखी खदखदतोय. केव्हाही उद्रेक होईल, अशी  स्थिती आहे. परंतु हा उद्रेक विरोधकांच्याच पथ्यावर पडेल, अशीच चिन्हे आहेत.

प्राध्यापकाचे `विद्यार्थी` चिडले

कर्जत-जामखेडचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांना विधानपरिषदेची उमेदवारी हवी होती. त्याबाबत त्यांच्या कार्यकर्त्यांनी तब्बल 81 शिफारशी पक्षश्रेष्ठींकडे पाठविल्या. पण त्या सर्वांनाच पक्षश्रेष्ठींनी `केटो` (केराची टोपली) दाखविली. त्यामुळे गेल्या दहा वर्षांची तपश्चर्या पाण्यात गेली. आमदार रोहित पवार यांच्याशी सामना करताना नाकात दम आलेल्या या नेत्याला पुढील काळात संधी नक्की मिळणार. मोठ्या घराण्याशी लढल्याची शाबासकी मिळणार, अशा गैरसमजुतीत राहिलेल्या प्रा. शिंदे यांचा विधानपरिषदेसाठी विचार न केल्याने भाजपअंतर्गत मोठा नाराज गट तयार झाला आहे. या मतदारसंघात तर भाजप आता नावालाच उरते की काय, अशीच स्थिती निर्माण होऊ पाहत आहे. कार्यकर्त्यांमध्ये आपल्याच पक्षाविषयी चिड व्यक्त होत आहे. परंतु लाॅक डाऊन असल्याने `वेट अॅण्ड सी`च्या भूमिकात सर्वजण आहेत. लाॅकडाऊन संपताच राजकीय हालचाली होण्याची शक्यता आहे. परंतु हे कार्यकर्ते कुठे जाणार, हा प्रश्न आहे. मात्र आमदार रोहित पवार या संधीचे सोने करणार नसतील, तर नवलच. सर्वांना समावून घेण्याची भूमिका घेवून कार्यकर्त्यांना `इनकमिंग` ते करू शकतात. त्याचाच परिणाम जामखेड-कर्जत हा हातचा बालेकिल्ला भाजप कायमचा गमावून बसण्याची चिन्हे आहेत.

`आई` आणि `मावशी`चा गळ्यात गळा

परळी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पराजय झाल्यानंतर राज्यात मोठा चमत्कार झाल्याची स्थिती निर्माण झाली. मुंडे या भाजपचा महाराष्ट्रातील चेहरा बनू पाहत होत्या. हेच नेमका अंतर्गत श्रेष्ठींना खपत नसावे. मुंडे यांचा `वारू` थोपविण्यासाठीच काही श्रेष्ठींनी प्रयत्न केल्याचे समजते. तो त्यांचा प्रयत्न यशस्वी झालाही असेल, परंतु पुढे विधान परिषदेत तरी संधी मिळेल, अशी या मतदारसंघात अपेक्षा होती. स्वर्गीय गोपिनाथराव मुंडे परळीला आई म्हणत होते. पाथर्डीला मावशी समजत होते. त्यामुळे त्यांच्या मुलीला म्हणजे पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेत उमेदवारी नाकारल्याने आई व मावशी दोघीही नाराज झाल्या. गळ्यात गळे घालून रडू लागल्या. आता त्यांचे लेकरे (कार्यकर्ते) पेटून उठू लागले आहेत. केवळ पंकजा मुंडे यांचे पक्षांतर्गत वाढते वजन पश्रक्षेष्ठींना देखावेना. म्हणूनच त्यांचे पंख छाटण्याचाच प्रकार झाला असल्याची भावना कार्यकर्त्यांमधून झाली आहे. त्यामुळे आगामी काळात पाथर्डी व परळीतील भाजप कार्यकर्ते सैरभैर होऊ शकतात. त्याचा परिणाम पाथर्डीच्या भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या राजकारणावर होऊ शकेल. अर्थात विरोधकांना या घडामोडींचा फायदाच होईल, यात शंका नाही. 

फडणवीस यांच्या निषेधाची तयारी

दरम्यान, प्रा. राम शिंदे व पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली नसल्याचे खापर कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माथी फोडले आहे. मुंडे व शिंदे यांचे पक्षात चांगले वजन होते. ते वाढू नये म्हणूनच त्यांचे पाय ओढण्याचाच प्रकारक झाल्याचे बोलले जाते. पाथर्डी तालुक्यातील मुंडे समर्थकांनी भाजपाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारी केल्याचे समजते. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर थांबा व पहा, अशी भुमिका मुंडे समर्थकांनी घेतली असली, तरी फडणवीस यांचा तीव्र शब्दात निषेध केला जात आहे. लाॅकडाऊन संपल्यानंतर मात्र रस्त्यावर उतरुन भाजपाला जाब विचारु आणि मग पक्षीय निर्णय घेवू, अशी तयारी सुरु आहे. विधान परिषदेत मुंडे यांना संधी देण्यात येईल, असा समर्थकांचा अंदाज होता. मुंडे यांनीही तशी तयारी केली होती. भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील बड्या नेत्याने मुंडे यांना पुन्हा डावलले, अशी कार्यकर्त्यांची भावना झाली आहे. पाथर्डीतील मुंडे यांचे समर्थक व बीड जिल्ह्याचे युवामोर्चाचे प्रभारी मुंकुंद गर्जे यांनी तर पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यावरूनच कार्य़कर्त्यांच्या भावना लक्षात येतात.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख