ती चर्चाच निराळी ! खासदार डाॅ. विखे पाटील यांना आमदार व्हायचे अन आमदार विखे यांना खासदार ? - That discussion is different! MP Dr. Vikhe Patil wants to be MLA and MLA Vikhe wants to be MP? | Politics Marathi News - Sarkarnama

ती चर्चाच निराळी ! खासदार डाॅ. विखे पाटील यांना आमदार व्हायचे अन आमदार विखे यांना खासदार ?

सतीश वैजापूरकर
बुधवार, 6 जानेवारी 2021

माजी खासदार (कै.) बाळासाहेब विखे पाटील हे खासदार आणि त्यांचे चिरंजीव राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीत आमदार, असे समीकरण बरीच वर्षे रूढ होते.

राहाता : राजकारणात बरीच वर्षे शिर्डी विधानसभा मतदारसंघात घालविली. जिवाभावाची मित्रमंडळी येथे आहेत. इकडे येण्याची इच्छा होते, भविष्यात मी इकडे आलो, तर तुमची काही अडचण नाही ना, अशी विचारणा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांचे साडू व शिर्डीचे नगरसेवक अभय शेळके यांच्याकडे जाहीर कार्यक्रमात केली. त्यांनी विनोदाने केलेले हे विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले. 

माजी खासदार (कै.) बाळासाहेब विखे पाटील हे खासदार आणि त्यांचे चिरंजीव राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीत आमदार, असे समीकरण बरीच वर्षे रूढ होते. या समीकरणाची नव्याने मांडणी करण्याच्या दृष्टीने खासदार डॉ. विखे पाटील यांनी हे विधान केले असावे, असा तर्क लावला जात आहे. 

येथील डॉ. संतोष मैड यांच्या मल्टिस्पेशालीटी रुग्णालयातील विविध वैद्यकीय सेवांचा प्रारंभ डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते झाला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी वरील विधान करून हशा व टाळ्या वसूल केल्या. मात्र, कार्यक्रमानंतर त्यांचे हे विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले. 

मध्यंतरी आपण केंद्रात मंत्री झालो, तर आश्‍चर्य वाटू देऊ नका, असे विधान करून डॉ. विखे यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यापाठोपाठ आता आपण इकडे आलो, तर चालेल का, असा प्रश्न जाहिरपणे उपस्थित करीत त्यांनी चर्चेला निमंत्रण दिले.

सांसदिय कामकाजात सक्रीय असलेला, राज्याच्या शुगर लॉबीतील तरूण चेहरा, या नात्याने डॉ. सुजय यांना केंद्रातील मंत्रीमंडळात संधी मिळू शकेल. त्यांचे वडील आमदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय मैत्री त्यासाठी पूरक ठरू शकेल. असे संदर्भ त्यांच्या केंद्रात मंत्री होण्याबाबतच्या विधानाला होते. शिवाय त्यांनी नुकतीच वडिलांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटही घेतली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी शिर्डी विधानसभा मतदारसंघात परत यावेसे वाटते, त्यात तुमची अडचण तर होणार नाही ना, या त्यांच्या प्रश्नाचा संदर्भ थेट पुढच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीशी आहे. त्यास अद्याप साडेतीन वर्षांचा अवधी आहे. त्यांचे वडील नगरमधून लोकसभेसाठी आणि ते शिर्डीतून विधानसभेसाठी, असा त्यांच्या या विधानाचा रोख असावा. मात्र, सध्यातरी त्यासाठी दिल्ली बहोत दूर है, अशी स्थिती आहे. त्या दृष्टीने चर्चा घडवून आणण्यासाठी त्यांनी हे विधान जाणीवपूर्वक केले असावे, असा कयास आहे. 

माजी खासदार (कै.) बाळासाहेब विखे पाटील हे खासदार आणि त्यांचे चिरंजीव राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीत आमदार, असे समीकरण बरीच वर्षे रूढ होते. या समीकरणाची नव्याने मांडणी करण्याच्या दृष्टीने खासदार डॉ. विखे पाटील यांनी हे विधान केले असावे, असा तर्क लावला जात आहे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख