श्रीरामपूर : बेलापूर येथील व्यापाऱ्याच्या हत्याकांडामुळे तालुक्यातील व्यावसायिकतेतून झालेल्या वादांचा भांडाफोड होत आहे. यापूर्वीशी अशा पद्धतीचे वाद झाले होते. परंतु हत्या करणे हा कळसच झाला आहे.
आज विशेष पोलिस महासंचालक प्रताप दिघावकर हे बेलापूर गावात येऊन याबाबतची माहिती घेणार आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही लोकांची चाैकशी होऊ शकते.
बेलापूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण यांचे अपहरण व हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना श्रीरामपूर परिसरातून ताब्यात घेतले. सागर गंगावणे व बिट्टू ऊर्फ रावजी वायकर अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर यापूर्वीही विविध गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा... राष्ट्रवादीच्या हाती जिल्हा बॅंकेची दोरी
पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी काल सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांना ही माहिती दिली. बेलापूर-राहुरी बाह्यवळण परिसरातून सोमवारी (एक मार्च) सायंकाळी व्यापारी हिरण यांचे अपहरण झाले होते. सुरवातीला शहर पोलिसांनी हिरण बेपत्ता झाल्याची नोंद केली. ग्रामस्थांच्या माहितीनुसार नंतर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. पोलिस तपास सुरू असताना ता. 7 सकाळी येथील वाकडी रस्त्यावरील यशवंतबाबा रेल्वे चौकी परिसरात हिरण यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला होता.
पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले, ""डोक्याला गंभीर मार लागल्याने हिरण यांचा मृत्यू झाल्याचे उत्तरीय तपासणी अहवालात म्हटले आहे. पोलिस तपासात गंगावणे व वायकर यांची नावे समोर आली. दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यातील सबळ पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत एकूण 40 जणांची चौकशी केली. तपासात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. हिरण यांच्या हत्येचा तपास पूर्ण होईपर्यंत पोलिस थांबणार नाहीत.
हेही वाचा.. हे तर गृहखात्याचे अपयश ः विखे
गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य कलम लावणे महत्त्वाचे असते. उशिरा गुन्हा दाखल केल्यास संबंधित पोलिसांवर कारवाई केली जाईल.''
यासंदर्भात आतापर्यंत 21 पोलिसांना "कारणे दाखवा' नोटिसा बजावल्याचे पाटील यांनी सांगितले. अपर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, संगमनेर येथील पोलिस उपअधीक्षक राहुल मदने, पोलिस निरीक्षक संजय सानप उपस्थित होते.
उत्तरीय तपासणीनंतर पोलिसांनी औरंगाबादहून काल दुपारी येथील बोरावकेनगर परिसरातील हिरण यांच्या घरी त्यांचा मृतदेह आणला. त्यावेळी व्यापारी, ग्रामस्थांनी शोक व्यक्त करीत, हिरण यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, सुनील मुथा, दीपक पटारे, अरुण नाईक, बेलापूरचे सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, सुधीर नवले आदी उपस्थित होते. आरोपींना अटक होईपर्यंत हिरण यांचा अंत्यविधी करणार नसल्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली.
पोलिस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या आश्वासनानंतर बेलापूर येथे उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ बेलापुरात आज सलग तिसऱ्या दिवशी "बंद' पाळण्यात आला. बेलापूरसह येथील बोरावकेनगर परिसरात चोख पोलिस बंदोबस्त होता.
Edited By- Murlidhar Karale

