राज्यातील वेगळा प्रयोग ! गावाच्या सत्तेची दोरी महिलांच्या हाती देण्याची तयारी  - A different experiment in the state! Preparation to hand over the reins of village power to women | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यातील वेगळा प्रयोग ! गावाच्या सत्तेची दोरी महिलांच्या हाती देण्याची तयारी 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 13 जानेवारी 2021

निवडणूक होत असलेल्या सर्व आठ जागांवर मंडळाने महिला उमेदवार दिल्या असून, "सशक्त नारी घडवेल सशक्त समाज' असे ब्रीद घेऊन गावकऱ्यांना गावाच्या कारभाराची दोरी महिलांच्या हाती सोपविण्याचे आवाहन केले आहे. 

अमरापूर : ढोरजळगाव-ने (ता. शेवगाव) येथे ग्रामपंचायतीसाठी मतदान होत असलेल्या सर्व आठ जागांवर महिलांना उभे करून सत्ताधारी जगदंबा ग्रामविकास मंडळाने, स्त्रीशक्तीचा जागर घडून गावची संपूर्ण सत्ता महिलांच्या हाती सोपविण्याचे आवाहन मतदारांना केले आहे. 

नऊ सदस्य असलेल्या ढोरजळगाव-ने ग्रामपंचायतीसाठी भाजपप्रणीत जगदंबा ग्रामविकास मंडळ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रणीत सावशीदबाबा ग्रामविकास मंडळ यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे. प्रभाग दोनमध्ये एका जागेवर किशोर एकनाथ कराड हे जगदंबा ग्रामविकास मंडळाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या जागेवरही शालिनी बाळासाहेब कराड यांना सत्ताधारी मंडळाने उभे केले होते. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा अर्ज मागे घेण्यात आला. आता निवडणूक होत असलेल्या सर्व आठ जागांवर मंडळाने महिला उमेदवार दिल्या असून, "सशक्त नारी घडवेल सशक्त समाज' असे ब्रीद घेऊन गावकऱ्यांना गावाच्या कारभाराची दोरी महिलांच्या हाती सोपविण्याचे आवाहन केले आहे. 

विशेष म्हणजे सर्व प्रवर्गांतील महिलांसाठी आरक्षित जागांबरोबरच सर्वसाधारण व्यक्ती, अनुसूचित जाती व्यक्ती, नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुषांसाठी राखीव जागांवरही महिलाच उभ्या केल्याने, तालुक्‍यामध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे. 
वर्षानुवर्षे सत्तेच्या विविध पदांवर असलेली पुरुषांची मक्तेदारी मोडून महिलांनाही सत्तेत वाटा मिळावा, त्यांच्या संकल्पनेतून आदर्श गाव उभे राहावे, यासाठी सरकारने सर्वच प्रवर्गांतील जागांमध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, ढोरजळगाव-ने येथील जगदंबा मंडळाने सर्वच जागांवर महिला उमेदवार दिल्याने, गावातील मतदार आता काय निर्णय घेतात, यावरच ग्रामपंचायतीच्या सत्तेचे गणित अवलंबून असणार आहे. 

 

हेही वाचा...

निवडणुकीमुळे वातावरण गुलाबी थंडीत गरम 

श्रीरामपूर : तालुक्‍यातील 26 ग्रामपंचायतींच्या 266 सदस्यपदांसाठी शुक्रवारी (ता. 15) मतदान होत आहे. त्यामुळे गावागावांत प्रचाराचा धुरळा उडाला आहे. विविध गावांत पॅनलप्रमुख आपल्या उमेदवारांना सोबत घेऊन गृहभेटीसह शिवारफेरीही करीत आहेत. मतदारांच्या घरी जाऊन, "आम्ही गावाचा विकास करू, गावातील समस्या मार्गी लावू,' असे आश्वासन देत आहेत. तालुक्‍याच्या विविध भागांत ऐन हिवाळ्यात सलग दोन दिवस पाऊस झाला असला, तरी ग्रामीण भागातील राजकारण मात्र तापले आहे. 

प्रचारासाठी मोजके दिवस उरले असल्याने, उमेदवार सकाळीच गावात एकत्र येऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत. पॅनलमधील उमेदवार रात्री उशिरापर्यंत घरोघरी जाऊन भरघोस मतांसाठी विनंती करीत आहेत. बेलापूर, टाकळीभान, पढेगाव आणि कारेगाव परिसरात उमेदवारांची पोस्टरबाजी सुरू आहे. गावातील मुख्य रस्ते, चौकांमध्ये फोटोसह झळकत असलेली उमेदवारांची पोस्टर ग्रामस्थांचे लक्ष वेधत आहेत. 
आमच्या पॅनलचे उमेदवार दुसऱ्यापेक्षा कसे सरस आहेत, हे पटवून देण्यात कार्यकर्ते दिवस-रात्र प्रयत्नशील आहेत. आमचे पॅनल विजयी झाल्यास गावात एकजुटीने काम करून विविध समस्या सोडविणार असल्याचे आश्वासन उमेदवार देत आहेत. गावातील पिण्याच्या पाणीप्रश्नासह रस्ते, वीज अशा विविध समस्या मार्गी लावणार असल्याची ग्वाही गावपुढारी देत आहेत. अनेक गावांतील रखडलेले विविध प्रश्न सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. निवडणूक कामांसाठी प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यासह कर्मचारी कार्यरत आहेत. प्रशासनाने गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी तयारी केली आहे. 

येथील प्रशासकीय यंत्रणेकडून मतदानयंत्रांची तपासणी केली जात आहे. त्याचप्रमाणे 26 गावांतील 130 बूथवर मतदान अधिकारी- कर्मचाऱ्यांसह सहायक अधिकारी, असे 850 निवडणूक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. स्थानिक पोलिस प्रशासनही सज्ज ठेवले आहे. तालुक्‍यातील बेलापूर, टाकळीभान, कारेगाव, गोंडेगाव, पढेगाव, अशा तालुक्‍यातील 26 गावांतील राजकीय वातावरण तापले आहे. खानापूर येथील ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून, ब्राह्मणगाव वेताळ येथील दोन, तर सराला आणि निपाणी वडगाव येथील प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली आहे. तालुक्‍यातील 26 ग्रामपंचायतींच्या 266 सदस्यपदांसाठी निवडणूक होत आहे. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख