That dialogue between MLA Lahamate and Tehsildar is the sarpanch's jewel | Sarkarnama

आमदार लहामटे व तहसीलदारांमधील तो संवाद सरपंचांच्या जिव्हाऱी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 जून 2020

तीन महिन्यात पाच किलो वजन कमी झाले आहे. काैटुंबिक जबाबदारी सांभाळून आम्ही रात्रंदिवस कोरोनाविषक जबाबदारी पार पाडत आहोत. गाव हेच आपले कुटुंब आहे, याप्रमाणे त्याची काळजी घेतो, परंतु आमदार व तहसीलदार आम्हालाच धारेवर धरतात.

अकोले : आमदार डाॅ. किरण लहामटे व तहसीलदार यांच्यातील संवादाची क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाली. त्यात सरपंचांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. ही क्लिप सरपंचांच्या जिव्हारी लागली असून, अकोले तालुक्यातील सरपंच एकत्र येवून त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.

प्रातिनिधिक स्वरूपात महाराष्ट्र सरपंच सेवा संघटनेच्यावतीने ३० सरपंचांनी एकत्र येऊन तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन दिले. आम्हाला आमचे अधिकार लेखी स्वरूपात द्या, अन्यथा आमचे अधिकार तुम्ही व लोकप्रतिनिधींनी सांभाळून आम्हाला या कामातून मुक्त करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सरपंचांनी निवेदनात म्हटले आहे, की जनतेचा रोष पदरात पाडून आम्ही आधीच अडचणीत आलो आहोत. त्यात तुम्ही व आमदार जर कारवाईने आमची पदे घालवीत असाल, तर मग ते काम नकोच. कारवाई करायची असेल, तर सर्वच सरपंचावर करा, असे सर्वच सरपंचानी एकमुखाने तहसीलदारांकडे मागणी करीत सामाजिक अंतर पाळून आपला रोष व्यक्त केला. राजूर येथील व्यापारी संघटनांनीही आपली राजूर ग्रामपंचायत व कमिटीबाबत तक्रार नसल्याचे लेखी पत्र दिले. या वेळी तहसीलदारांनी दोनच दिवसांत लेखी दिले जाईल, असे आश्वासन दिले. तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर सर्व सरपंचानी आपली भूमिका मांडली. 

या वेळी बोलताना सरपंच परिषदेचे अध्यक्ष बाबासाहेब उगले म्हणाले, की कोरोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तालुक्यात प्रत्येक गावातील सरपंच डोळ्यात तेल घालून आम्ही काम करीत आहेत. रात्री एक वाजताही उठून संबंधितांना क्वारांटाईन करण्यासाठी धावपळ करतात, मात्र आमदार व तहसीलदारांनी सरपंचवर कारवाई करणे व पदे जाण्याची भाषा केली, त्याचा निषेध करून या व्हायरल झालेल्या क्लिपचे चौकशी व्हावी.

आमदारांनी पाठीवर थाप टाकायला हवी

भास्कर एलमामे म्हणाले, की राजूर येथे शासनाच्या मार्गदर्शक तत्वानेच काम करत असून, सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व व्यावसायिकांना संधी दिली जाते. २४ जून रोजी झालेल्या व्यापारी व कोरोना कमिटीमध्ये दुकानाच्या वेळा मान्य करण्यात आल्या आहेत. आज व्यापाऱ्यांनी तसे लेखी दिले आहे. सरपंच गणपत देशमुख यांची तर त्यांच्या बहीणीला देखील क्वारंटाईन केले होते. योग्य नियोजनामुळे राजूर कोरोनमुक्त आहे, तरी देखील आमदार व तहसीलदार हे आमच्या पाठीवर थाप मारण्याऐवजी आमच्यावर कारवाई करीत असेल, तर ही बाब निषेधार्ह आहे. जबाबदार व्यक्तींनी जबाबदारीने बोलले पाहिजे.सरपंच संघटनेचे प्रदीप हासे यांनी आमदार व तहसीलदार यांनी सरपंच यांचे अधिकार कोणते, हे सांगावे व यापुढे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या क्लिप व्हायरल होऊ नये, झाल्यास शासनाने त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली.

महिला सरपंच भारती नवले म्हणाल्या, की तीन महिन्यात पाच किलो वजन कमी झाले आहे. काैटुंबिक जबाबदारी सांभाळून आम्ही रात्रंदिवस कोरोनाविषक जबाबदारी पार पाडत आहोत. गाव हेच आपले कुटुंब आहे, याप्रमाणे त्याची काळजी घेतो, परंतु आमदार व तहसीलदार आम्हालाच धारेवर धरतात, त्यापेक्षा तुम्हीच सांभाळा हा कारभार, असे सांगून त्यांनी या वक्तव्याचा निषेध केला.अनिता

कडाळे म्हणाल्या, वारुंघुशी गावात मुंबईहून आलेले लोकांना क्वारंटाईन करताना त्याच्या शिव्याशाप खाल्ले. पुढच्यावेळी सरपंच कसे होतात, ते पाहतो असे म्हणून आम्ही पदाला न डगमगता काम करतो. त्यात आमदार व तहसीलदार असे म्हणत असेल, तर ``आई भीक मागू देईना व बाप खाऊ देईना`` अशी गत  झाली.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख