पारनेर : त्या पाच नगरसेवकांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले. शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केल्याचे सांगितले जाते, तथापि, त्याचा निर्णय अद्याप वरिष्ठांकडून सांगितला गेला नाही. अशाही परिस्थिती ते नगरसेवक मात्र डगमगले नाहीत. आता काहीही झाले तरी घरवापसी करणार नसून, राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्याच नेतृत्त्वाखाली काम करणार आहोत, असे त्यांनी ठणकावून सांगितल्याने हा पेच कायम राहिला आहे.
आम्ही मातोश्रीवर कैफियत मांडू : सय्यद
नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद म्हणाले, की आम्ही शिवसेना सोडली आहे. आता पुन्हा शिवसेनेत जाणे शक्यच नाही. आम्हाला शिवसेनेत परत जाण्यास सांगितले, तर आम्ही आमची कैफियत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर "मातोश्री'वर जाऊन मांडू. आम्ही शिवसेना पक्षावर नाराज नाही, तर स्थानिक नेतृत्वावर नाराज आहोत. मुळात पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाच्या हुकूमशाहीमुळे आम्ही बाहेर पडलो आहोत. आम्हाला स्थानिक प्रश्न महत्त्वाचे आहेत. ते सुटावेत, ही अपेक्षा आहे.
काहीही झाले तरी "नाही' : औटी
वैशाली औटी म्हणाल्या, घेतलेल्या निर्णयावर आम्ही आता ठाम आहोत. वेळ पडली तर नगरसेवकपदाचा राजीनामा देऊ; मात्र पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार नाही. यापुढे काहीही झाले तरी आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सोडणार नाही.
शहराचा विकास महत्त्वाचा : देशमाने
नंदा देशमाने म्हणाल्या, की आम्ही स्थानिक नाराजीतून शिवसेनेतून बाहेर पडलो आहोत. यात आता बदल होणे शक्य नाही. यापुढील काळात आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतच काम करणार आहोत. आम्ही सर्वांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. आता तो पुन्हा फिरवणे शक्य नाही. नगरसेवकपद महत्त्वाचे नाही, तर शहरातील जनतेची कामे व शहराचा विकास महत्त्वाचा आहे.
हा काही किराणा माल नाही : देशमुख
नंदकुमार देशमुख म्हणाले, की आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आमचा प्रवेश झाला आहे. मागे कसे जाणार? हा काही किराणा माल नाही की तो मागे देता येईल. आमचे शिवसेनेच्या पक्षनेतृत्वाशी भांडण नाही, तर आमचे भांडण स्थानिक नेतृत्वाशी आहे. आता त्यांच्याबरोबर जमणे शक्य नाही.
आमचा विरोध स्थानिक नेतृत्त्वाशी ः गंधाडे
किसन गंधाडे म्हणाले, की आमचा स्थानिक नेतृत्वास विरोध आहे. पुढील काळात आमदार लंके यांच्यासोबत काम करणार आहोत. त्यांच्याबरोबर राहूनच शहराचा पाणीप्रश्न सोडवू, तसेच इतर विकासकामे करून घेऊ. आमच्यावर स्थानिक नेतृत्वाने किती अन्याय केला, याचा पाढा मुंबईला जाऊन पक्षश्रेष्ठींपुढे वाचू. नगरसेवकपदाचे राजीनामेही देण्यास आम्ही तयार आहोत. मात्र मागे जाणार नाही.

