nagar.png
nagar.png

मोठी गर्दी होऊनही नगरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

कोरोनाची भिती न जुमानता नागरिक रस्त्यावर आले, तर विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली.

नगर : दीपावलीनिमित्त जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून कमालीची गर्दी होत आहे. मात्र रुग्णसंख्येत वाढ होत नसून, कमालीची घट होत आहे. त्यामुळे काहीसा दिलासा वाटत असला, तरी या गर्दीचा परिणाम येत्या आठ दिवसांत जाणवू लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

दीपावलीच्या खरेदीसाठी नगर शहरातील कापडबाजार, माळीवाडा, चितळेरोड, प्रोफेसर काॅलनी चाैक आदी परिसरात मोठी गर्दी झाली होती. कोरोनाची भिती न जुमानता नागरिक रस्त्यावर आले, तर विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली. अशीच स्थिती संगमनेर, राहुरी, पाथर्डी, कोपरगाव, शिर्डी आदी मोठ्या शहरांतही होती. मास्क नसल्याने दंडात्मक कारवाईचा इशारा देऊनही लोकांनी नियमांची पायमल्ली केली. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होईल, अशी भिती होती, तथापि, अद्यापतरी वाढ झालेली दिसत नाही. 

जिल्ह्यात आज ११० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५७ हजार २२४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३५ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, दिवसभरात रूग्ण संख्येत ११० ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १ हजार २६७ इतकी झाली आहे. आज जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३८ आणि अँटीजेन चाचणीत ६३ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ८, पाथर्डी १ अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १७, अकोले ४, नगर ग्रामीण २, नेवासे १, राहुरी २, संगमनेर १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ६३  जण बाधित आढळुन आले. यामध्ये, अकोले १८, जामखेड १, कर्जत २, कोपरगाव ३, नगर ग्रामीण १२, पारनेर २, पाथर्डी ५, राहता ४, संगमनेर ७,  शेवगाव ४, श्रीगोंदे ४, कॅन्टोन्मेंट १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात 57 हजार 224 रुग्ण बरे झाले असून, सध्या 1 हजार 267 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 899 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णसंख्या 59 हजार 390 झाली आहे.

दरम्यान, दीपावलीच्या काळात सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझरचा वापर, मास्क बंधनकारक असले, तरी शासनाच्या आदेशाला नागरिकांनी केराची टोपली दाखविली. गर्दी करू नका असे म्हटले असले, तरी सर्वच बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com