Despite the change of party, Madhukarrao Pichad's relationship with Sharad Pawar remained intact | Sarkarnama

पक्षांतर होऊनही मधुकरराव पिचड यांची शरद पवार यांच्याशी आत्मियतेची नाळ कायम

मुरलीधर कराळे
मंगळवार, 30 जून 2020

पुत्रप्रेमापोटी पिचड यांनी भाजपमध्ये उडी घेतली, खरी पण ते मनाने पवार यांच्यासोबतच राहिले. त्याचे प्रत्यंतर काल आले. पवार यांच्यावर भाजप आमदाराने केलेले आरोप पिचड यांना खूप दुःख देवून गेले.

नगर : महाराष्ट्राच्या राजकारणात ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा निष्ठेचा कार्यकर्ता म्हणून माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांची ओळख राज्यालाच नव्हे, तर देशाला आहे. तथापि, मागील वर्षी विधानसभेच्या दरम्यान झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये पुत्रप्रेमापोटी पिचड यांनी भाजपमध्ये उडी घेतली, खरी पण ते मनाने पवार यांच्यासोबतच राहिले. त्याचे प्रत्यंतर काल आले. पवार यांच्यावर भाजप आमदाराने केलेले आरोप पिचड यांना खूप दुःख देवून गेले. त्यांच्या वक्तव्यावरून ते सर्वांनी अनुभवले.

काॅंग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसची स्थापना केली. तेव्हा त्यांच्यासोबत पिचड यांनी निर्विवादपणे पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले. राष्ट्रवादी काॅंग्रेसची स्थापना झाली, तेव्हा या नवीन पक्षाचचे काय होईल, आपले स्थान कुठे असेल, शरद पवारांनी राजकारणात वेगळी चूल मांडली, हा प्रयोग कितपत यशस्वी होईल, अनेक एक ना अनेक प्रश्न तत्कालीन नेत्यांना भेडसावत होते. मात्र पिचड यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांनी पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले. पवार करतील, ते योग्यच आहे, हे सर्वजण जाणून होते. त्यातील पिचड हे एक व्यक्तीमत्त्व. पक्षाच्या स्थापनेपासूनच नव्हे, तर त्या आधीपासून ते पवार यांच्यासोबत राहिले. पवारांनीही त्यांना तितकेच प्रेम दिले. आपल्या ह्यदयात स्थान दिले. वारंवार आमदार केलेच, शिवाय अनेकदा मंत्रीपदी बसविले. महत्त्वाचे निर्णय पिचड यांच्याशी चर्चा करूनच घेतले जात होते. पिचड राजकारणात थकले. त्यामुळे त्यांचे पूत्र वैभव पिचड यांनाही आमदार करण्याची किमया पवार यांनी करून दाखविली.

अकोले हा दुर्गम भागातील तालुका. आदिवासी पट्टा असलेल्या या भागात इतर मंत्र्यांची ये-जा नसणे स्वाभाविकच आहे. मात्र पवार यांचे अनेक कार्यक्रम अकोल्यात झाले. केवळ पिचड यांच्यावरील प्रेमापोटी हे सर्व झाले. वैभव पिचड यांना मिळालेली संधी ही पिचड कुटुंबियांसाठी महत्त्वाची होती. 
2014 च्या निवडणुकीत वैभव पिचड यांना चांगले मताधिक्य मिळून अकोले मतदारसंघावर राष्ट्रवादीची तसेच पिचड घराण्याचीच निर्विवाद सत्ता आहे, हे सिद्ध झाले. 

असे असले, तरी काळ बदलतो, तशी परिस्थितीही बदलते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे वारे अधिक जोराने वाहू लागले. केंद्रात भाजप, राज्यातही भाजपचीच सत्ता त्यामुळे भाजपचेच जास्त आमदार येतील, अशी शक्यता राजकीय धुरिणांकडून व्यक्त होत होती. त्यामुळे पिचड यांनाही आपल्या विजयाबाबत व शरद पवार यांच्या नेतृत्त्वाबाबत शंका निर्माण होऊ लागली. त्यांनी अखेर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात हा राष्ट्रवादीच्या दृष्टीने मोठा स्फोट घडून आला. 27 जुलै 2020 रोजी इंदुरी येथे मेळावा घेवून त्यांनी आपण भाजपमध्ये जात असल्याची घोषणा केली. मधुकरराव पिचड यांनी राष्ट्रवादीला म्हणजेच शरद पवार यांची साथ सोडून ते भाजपवासी झाले. याची अकोले तालुक्यात चर्चा झाली. पिचड यांचे जुने कार्यकर्त्यांनाही काहीसे दुःख झाले. आपण पवार यांच्यासोबतच रहावे, असे काही जुन्या कार्यकर्त्यांनी सांगितले. तथापि, पुत्रप्रेमापुढे मधुकरराव पिचड यांचे काहीही चालले नाही. 

गेल्या सहा महिन्यांपासून राष्ट्रवादी व भाजप यांच्यामध्ये वारंवार आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र मधुकरराव पिचड यांनी राष्ट्रवादीवर केव्हाही आरोप केले नाहीत. अशीच स्थिती राष्ट्रवादीचीही होती. शरद पवार यांनीही थेट पिचड यांच्यावर आरोप केले नाही. पक्षीय पातळीवर निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप होणे साहजिकच आहेत. मात्र दोघांनीही व्यक्तीगत टीका केली नाही, हे विशेष.

मागील आठवड्यात पवार यांच्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली. या टीकेबाबत राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी निषेध व्यक्त केले. भाजप नेत्यांनी मात्र गप्प राहणे पसंत केले. मात्र पिचड यांना ते राहावले नाही. त्यांनी अखेर आमदार पडळकर यांचीच खरडपट्टी काढली. ``आपण भाजपमध्ये गेलो असलो, तरी शरद पवार यांना आपण जवळून पाहिले आहे. सर्वसामान्य, शेतकरी, कामगार, कष्टकरी वर्गाच्या सर्वांगीण विकासात त्यांचे योगदान नाकारून चालणार नाही,`` असे पिचड यांनी जाहीरपणे सांगून शरद पवार यांच्यावरील प्रेम व्यक्त केले.

``शरद पवार हे देशव्यापी नेतृत्त्व असून, (स्व.) यशवंतराव चव्हाण, (स्व.) वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांच्यानंतर शरद पवार यांचे नेतृत्त्व सर्व जातिधर्मांना, सर्वांना बरोबर घेवून राजकारण, समाजकारण करणारे राहिले आहेत. भाजप आमदार पडळकर यांनी अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आहे. पवार यांच्यावरील टीका माझ्या मनाला तीव्र दुःख देवून गेली,`` असे पिचड यांनी आपले मनोगत व्यक्त करून आपले पवार प्रेम दाखवून दिले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख