काॅंग्रेसचे देशमुख सरसावले ! कोरोनामुक्त शहरासाठी 1 हजार लोकांची टीम तयार - Deshmukh of Congress moves! A team of 1 thousand people formed for a corona-free city | Politics Marathi News - Sarkarnama

काॅंग्रेसचे देशमुख सरसावले ! कोरोनामुक्त शहरासाठी 1 हजार लोकांची टीम तयार

मुरलीधर कराळे
बुधवार, 29 जुलै 2020

महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाचा वाढता दर हा नगरमध्ये आहे. मृत्यूचे प्रमाण कमी असले, तरी एखाद्याला कोरोना झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाचे हाल होतात.

नगर : नगर शहर कोरोनामुक्त करण्यासाठी काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायकराव देशमुख सरसावले आहेत. त्यांनी त्यांच्या विकासवर्धिनी या संस्थेच्या माध्यमातून सुमारे 1 हजार सदस्यांची टीम तयार केली असून, त्यामाध्यमातून प्रबोधन, मदतकार्य आदी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.

नगर शहरात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शासकीय यंत्रणा अपुरी पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्तेही आपापल्या परीने प्रय़त्न करीत आहेत. तरीही रुग्ण कमी होत नाहीत, उलट त्यामध्ये वाढच होताना दिसत आहे. याबाबत देशमुख यांनी चिंता व्यक्त केली असून, आगामी काळात `मिशन कोरोना` समजून काम करणार असल्याचा निश्चय त्यांनी केला आहे.

याबाबत माहिती देताना देशमुख म्हणाले, ``महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाचा वाढता दर हा नगरमध्ये आहे. मृत्यूचे प्रमाण कमी असले, तरी एखाद्याला कोरोना झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाचे हाल होतात. संबंधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर घरच्यांचेही स्वॅब घेवून त्यांना क्वारंटाईन व्हावे लागते. एकाच घरात अनेक रुग्ण आढळल्यास संबंधित कुटुंबाला मोठा खर्च येत असून, त्याची आर्थिक स्थिती पूर्णपणे ढासळते. सध्या जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन आपापल्या परीने काम करते. रोज नवीन आदेश दिले जातात. परंतु नागरिकांतून हे आदेश पाळले जात नाही. योग्य प्रबोधन नसल्याने नागरिकांमध्ये काहीसे भितीचे वातावरण आहे. त्यामुळे कोरोनापासून स्वतःचा बचाव करणे, हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे, याची जाणीव त्यांना करून देणे आवश्यक आहे.``

असे करणार शहरात कामे

देशमुख म्हणाले, की विकासवर्धिनीच्या संपर्कातील 1 हजार लोकांची टीम काम करणार आहे. प्रत्येकजण आपापल्या परिसरात व आवश्यक तेेथे कोरोनाविषयक प्रबोधन करणार आहेत. कोरोनाबाधित कुटुंबियांना आवश्यक असलेली मदत मिळवून देण्याचा हे कार्यकर्ते प्रयत्न करतील. कोरोनाबाबत आवश्यक असणाऱ्या उपापयोजनांबाबत आग्रही राहणे, कोरोनासी यशस्वी सामना केलेल्या व्यक्तींचे अनुभव जनतेपर्यंत पोहचविणे, डाॅक्टर्स, परिचारिका, पोलिस, शासकीय कर्मचारी अन्य कोरोना योद्धाची यशोगाथा लोकांपर्यंत पोहचविणे, कोरोनाबाधत, गरजू व्यक्तींना वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करणे आदी कामे केली जाणार आहेत. यासाठी शहरातील 5 लाख लोकांपर्यंत पोहचून काम करणार असून, त्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जाणार आहे.

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख