नगर : पंढरपुरच्या कैकाडी मठाचे प्रमुख रामदास महाराज जाधव (कैकाडी) (वय 77) यांचे आज अकलूज येथे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर अकलूज येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायावर शोककळा पसरली आहे. नगर जिल्ह्यात त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. आज जिल्ह्यात अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
पंढरपुरच्या प्रसिद्ध कैकाडी मठाचे ते प्रमुख होते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत कैकाडी महाराजांचे ते पुतणे होत. नगर जिल्ह्यात रामदास महाराजांचे दरवर्षी अनेक कार्यक्रम होत. विविध संस्था त्यांना प्रवचन व कीर्तनासाठी बोलावत होत्या. राजकीय नेत्यांचेही त्यांचे चांगले संबंध होते. राजकारण करावे, पण त्याचा उद्देश केवळ समाजासाठीच असावा, असे ते कीर्तनातून सांगत. तसेच महाराष्ट्रातील राजकीय विषयांवर ते रोखठोक बोलत.
रामदास महाराजांच्या निधनाबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच नगर जिल्ह्यातून विविध संस्थांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
पंढरी पोरकी झाली : ब्रदीनाथ तनपुरे महाराज
रामदास महाराज यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाची मोठी हानी हानी झाली असून, आम्ही आमचा मार्गदर्शक गमावला. अवघी पंढरी पोरकी झाली, अशा शब्दांत नगर जिल्ह्याचे सुपूत्र तथा पंढरपुरच्या चारोधाम ट्रस्टचे प्रमुख बद्रीनाथ तनपुरे महाराज यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
ते म्हणाले, की रामदास महाराजांच्या निधनाची बातमी समजतात त्यांच्या अनेक आठवणी तनपुरे महाराज यांनी जाग्या केल्या. रामदास महाराज यांनी पांडुरंग संतांच्या भेटीला ही अनोखी संकल्पना सुरू केली होती. माऊलीची पालखी देहूला जात ही परंपरा त्यांनी सुरू करून पांडुरंगाचे आणि संतांचे नाते किती भक्तीभावाचा असू शकते, हे सर्वांना दाखवून दिले होते. पंढरपूरला चंद्रभागेच्या तीरावर भव्य असा तुकाराम गाथेचे पारायण करून भव्यदिव्य कार्यक्रम त्यांनी केला होता. या कार्यक्रमातून त्यांच्या विचार शक्तीची सर्वांना कल्पना येते. गाडगे महाराज जसे आपल्या संत विचारातून अंधश्रद्धा दूर करायचे, सर्वत्र चुकीचे काय चालले आहे. तोच विचार घेऊन त्यांनी संत विचारधारा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेली होती. जे चुकते तेथे त्यांनी बोट ठेवलं. रामदास महाराजांच्या निधनाने जणू पंढरी पोरकी झाली आहे. माझ्यापेक्षा वयाने ते दोन वर्षांनी मोठे होते. आम्ही अनेक संमेलने दोघांनी एकत्र केली आहेत. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी संत संमेलनामध्ये कीर्तन संमेलनांमध्ये आम्ही सहभागी होत असत, अशा आठवणी तनपुरे महाराजांनी सांगितल्या.

