राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा : आमदार विखे पाटील - Declare wet drought in the state: MLA Vikhe Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा : आमदार विखे पाटील

रविंद्र काकडे
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

राज्यात झालेल्या पावसाची आकडेवारी ही शासनाच्या मदतीच्या निकषापलिकडे गेली असल्याची बाब आमदार विखे पाटील यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

लोणी : राज्यात सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे गांभिर्य लक्षात घेवून, शेतकऱ्यांना मदत मिळवी म्हणून नुकसान भरपाईच्या निकषात बदल करावेत आणि राज्या‍त ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वड्डेटीवार यांना दिलेल्या निवेदनात आमदार विखे पाटील यांनी म्हटले आहे, की सध्याच्या परिस्थितीत राज्यात सातत्याने पाऊस सुरु आहे. बहुतांशी तलाव, लघु, मध्यम व मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने वाहत असून, ओढे, नाले व नद्यांना आलेल्या पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आले आहे. त्यामुळे हाताशी आलेली खरीपाची पिके जमीनदोस्त झाली आहेत. एकाच दिवसात ६५ मिलीमिटर पाऊस झाला, तरच नुकसान भरपाई देण्याचे शासनाचे धोरण आहे. परंतू राज्यात झालेल्या पावसाची आकडेवारी ही शासनाच्या मदतीच्या निकषापलिकडे गेली असल्याची बाब आमदार विखे पाटील यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

यावर्षी मान्सून वेळेवर सुरु झाल्याने कोवीडचा प्रादुर्भाव असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट घेतले. बाजरी, सोयाबीन, कडधान्ये, मका, कांदा इत्यादी पिकांची करण्यात आलेली पेरणी चांगल्या पध्दतीने होवून पिकही काढणीसाठी आलेली होती. मात्र सततच्या पावसामुळे हाताशी आलेली पिक जमिनदोस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

यापुर्वी बोगस बियाणांमुळे झालेली फसवणूक, शेतकऱ्यांवर आलेले दुबार पेरणीचे संकट आणि आता नैसर्गिक आपत्ती, यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे. मात्र पंचनाम्याच्या निकषात बदल केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या पदरात ही मदत पडणार नसल्याने विशेष बाब म्हणून नुकसान भरपाईच्या निकषात बदल करुन नुकसानीचे पंचनामे करावेत आणि राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे.

Edited By - Murlidhar Karale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख