Decision on college exams in two days: Tanpure | Sarkarnama

महाविद्यालयीन परीक्षांविषयी दोन दिवसांत निर्णय : तनपुरे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 29 मे 2020

बीए, बीकॉम, अभियांत्रिकी आदी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षांसंदर्भात राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. समितीमध्ये दोन संचालक, तसेच विविध विद्यापीठांचे कुलगुरू आहेत. समितीचा अहवाल आल्यानंतर दोन दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे.

नगर : "विद्यार्थ्यांचे आरोग्य व भविष्यातील करिअरचा विचार करून महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याविषयीचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या समितीचा अहवाल आज प्राप्त होणे अपेक्षित आहे. त्यानंतर दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल. विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करण्याची गरज नाही,'' असा दिलासा नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज विद्यार्थ्यांना दिला. 

शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत बोलताना तनपुरे म्हणाले, ""बीए, बीकॉम, अभियांत्रिकी आदी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षांसंदर्भात राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. समितीमध्ये दोन संचालक, तसेच विविध विद्यापीठांचे कुलगुरू आहेत. समितीचा अहवाल आल्यानंतर दोन दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे. परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या याबद्दलही अनेक मते आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांनी आपापल्या भूमिका सरकारकडे मांडल्याही आहेत. त्यांचीही दखल घेतली जाईल. विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी, "सर सलामत तो पगडी पचास' त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्‍यात घालून कोणताही निर्णय घेतला जाणार नाही.'' 
 

हेही वाचा...

"बाहेरगावांहून येणाऱ्या लोकांची माहिती द्यावी' 

कोपरगाव : शहरासह तालुक्‍यातील ग्रामीण भागात मोठ्या शहरांतून अनेक जण रात्री-अपरात्री येत आहेत. त्यातील काहींना प्रशासनाने शोधून क्वारंटाईन केले. मात्र, अनेक जण प्रशासनाला न कळविता, परस्पर घरी जात आहेत. त्यातून त्यांच्या कुटुंबासह शेजाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे आपल्या शेजारी बाहेरगावाहून येणाऱ्या व्यक्तीची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले. 

पत्रकात वहाडणे यांनी म्हटले आहे, की मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई येथून अनेक जण शहरासह ग्रामीण भागात येत आहेत. त्यांच्यातील काही जण कोरोनाबाधित निघाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. कोपरगावात प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व जागरूक नागरिकांमुळे आपण कोरोनापासून दूर आहोत. मात्र, बाहेरगावाहून येणाऱ्यांची माहिती प्रशासनास कळवा. ही माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवली जातील. सर्वांच्याच आरोग्यासाठी प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे आहे; अन्यथा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून काही बळी जातील. आपण "रेड झोन'मध्ये गेल्यास लहान-मोठे व्यवसाय बंद करून सर्वांना कठोर संचारबंदीला तोंड द्यावे लागेल, असे वहाडणे यांनी म्हटले आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख