मुख्यमंत्र्यांचा तो निर्णय काॅंग्रेसच्या दडपणाखाली ! दशरथ सावंत यांचे पत्र - That decision of the Chief Minister is under the pressure of the Congress! Letter from Dashrath Sawant | Politics Marathi News - Sarkarnama

मुख्यमंत्र्यांचा तो निर्णय काॅंग्रेसच्या दडपणाखाली ! दशरथ सावंत यांचे पत्र

शांताराम काळे
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

आणिबाणीच्या काळात स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याने आम्ही विरोधात गेलो. त्यामुळे त्या वेळी काॅंग्रेस सरकार पराभूत झाले होते. त्याचा वचपा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काॅंग्रेसच्या दडपणाखाली येत काढला आहे.

अकोले : आणिबाणीच्या काळात स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याने आम्ही विरोधात गेलो. त्यामुळे त्या वेळी काॅंग्रेस सरकार पराभूत झाले होते. आम्हालाही तुरुंगात जावे लागले. मागील सरकारने आम्हाला सुरू केलेली पेन्शन या सरकारने बंद केली. त्या पराभवाचा वचपा आता काॅंग्रेस पक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आडून काढत आहे. काॅंग्रेसच्या दडपणाखाली मुख्यमंंत्री येत आहेत, असा आरोप ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी केला आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र पाठविले आहे.

गेल्या चाळीस वर्षात आम्ही सरकारला काहीच मागितले नाही. आम्ही सरकारच्या दारात मागायला गेलेलो नसताना आमचा हा अपमान तुम्ही का केला? आमच्या आत्मसन्मानाचा अवमान करू नका, असेही सावंत यांनी पत्रात म्हटले आहे. आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांचे पेन्शन ठाकरे सरकारने बंद केली आहे. ८२ वर्षाचे  दशरथ सावंत यामुळे व्यथित झाले आहेत.

पत्रात ते म्हणतात, की आणीबाणीत स्वातंत्र्याची गळचेपी झाली होती. ते न बघवल्याने आमच्यासारखे अनेक लोक कुटुंबाच्या हिताची पर्वा न करता आंदोलन करून तुरुंगात गेले. त्यानंतर काँग्रेस सरकार पराभूत झाले, पण तुरुंगवासाच्या बदल्यात जनता सरकारने आम्हाला काही द्यावे, असे आम्ही कधीच मागितले नाही. चाळीस वर्षात आम्ही कोणत्या सरकारकडे कोणतीच याचना केली नाही, परंतु मागील सरकारने आम्हाला पेन्शन दिली. त्यासाठीही नोकरशाहीने भरपूर त्रास दिला आणि आज तुम्ही ते पेन्शन बंद करून आमच्यासारख्या आयुष्याचे काही शेवटचे दिवस उरलेल्या व्यक्तींना अवमानित केले आहे.

आर्थिक बचत करण्यासाठी हा निर्णय घेतला, असे सरकारने म्हटले होते. त्याबाबत सावंत यांनी तिरकसपणे मंत्र्यांसाठी खरेदी केलेल्या गाड्यांची आठवण करून दिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर महिन्याला साडेबारा हजार कोटी दर महिन्याला खर्च होताना बचतीसाठी त्यांना तुम्ही हात लावत नाही, परंतु या २४ कोटीसाठी मात्र तुम्हाला बचत आठवली. याचीही जाणीव सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली आहे. 

पत्राच्या शेवटी काँग्रेससोबत सरकार आहे व काँग्रेसने आणीबाणी लागली होती, त्यामुळे आणीबाणी विरोधकांच्या या पेन्शनला काँग्रेसचा विरोध आहे, म्हणून ही पेन्शन बंद केली आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला असून, काँग्रेसचा या  आणीबाणीला विरोध असल्यामुळे त्यांच्या दडपणाखाली तुम्ही हा निर्णय घेतला का? असा प्रश्न विचारला आहे.पत्राच्या शेवटी महाराष्ट्राची अस्मिता बाळासाहेब ठाकरे यांनी जपली व खेड्यापाड्यातील तरुणांच्या मनात स्वाभिमान जागृत केला. काँग्रेसच्या राजकारणाविरुद्ध लढा दिला, तेव्हा काँग्रेसच्या दडपणाखाली न येता महाराष्ट्राचा स्वाभिमान तुम्ही जागृत ठेवावा, काँग्रेसच्या दडपणाखाली येऊ नये, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख