परीक्षा रद्दचा निर्णय विश्‍वासघातकी : विखे पाटील - Decision to cancel exam is treacherous: Vikhe Patil | Politics Marathi News - Sarkarnama

परीक्षा रद्दचा निर्णय विश्‍वासघातकी : विखे पाटील

सतीश वैजापूरकर
गुरुवार, 11 मार्च 2021

परीक्षा जेवढ्या लांबणीवर जातील, तेवढे वयोमर्यादेच्या अटीमुळे विद्यार्थांना भविष्यात या परीक्षेस बसणे अडचणीचे ठरेल, याचे भान राज्य सरकारने ठेवायला हवे होते.

शिर्डी : "महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय विश्वासघातकी असून, या निर्णयाचा फेरविचार करून सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा,'' अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. 

"कोरोना संसर्गाच्या कारणाने यापूर्वीच सलग पाच वेळा या परीक्षा राज्य सरकारने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. आता रविवारी (ता. 14) या परीक्षा होतील, या आशेने विद्यार्थी तयारी करीत होते; मात्र सरकारने अचानक परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांसमोर अडचण निर्माण केली. सरकारचा निर्णय हा अतिशय विश्वासघातकी असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. 

हेही वाचा... निळवंडेसाठी 365 कोटींची तरतूद

पाच वेळा परीक्षा रद्द

या परीक्षेच्या तयारीकरिता बहुतांश ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात जाऊन राहत आहेत. यासाठी त्यांना खर्चाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. सलग पाच वेळा परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी आता हवालदिल झाले आहेत. त्यातच या परीक्षेसाठी वयाची अट असल्याने, परीक्षा जेवढ्या लांबणीवर जातील, तेवढे वयोमर्यादेच्या अटीमुळे विद्यार्थांना भविष्यात या परीक्षेस बसणे अडचणीचे ठरेल, याचे भान राज्य सरकारने ठेवायला हवे होते. मात्र, या सरकारकडे तशी संवेदनशीलता नसल्याने, फक्त कोविडचे कारण पुढे करून विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात घालण्याचे पाप राज्य सरकार करीत आहे,'' अशी टीका त्यांनी केली. 

हेही वाचा... गडाखांबाबत विखेंनी काय मध्यस्थी केली

त्यावेळी कोरोना नव्हता का

"केंद्र सरकारने कोविडची सर्व नियमावली पाळून यूपीएससीच्या परीक्षा यशस्वीपणे घेतल्या. राज्य सरकार एवढे कोविडचे नियम जनतेवर लादते तर त्या नियमानेच या परीक्षासुद्धा होऊ शकल्या असत्या. नुकतीच आरोग्य विभागाची परीक्षा राज्य सरकारने घेतली, तेव्हा कोविड नव्हता का,'' असा प्रश्न उपस्थित करून, ""कोविडच्या नावाखाली सरकार फक्त आपली जबाबदारी झटकण्याचे काम करीत आहे. परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचा सरकारने फेरविचार न केल्यास केल्यास राज्यात विद्यार्थ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील,'' असा इशारा विखे पाटील यांनी दिला आहे. 

नगरमध्ये आंदोलन

दरम्यान, आज नगर शहरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. पोलिसांनी विद्यार्थ्यांना समज देऊन त्यांना नंतर सोडून देण्यात आले. या प्रश्नी विद्यार्थी संतप्त होते. शहराबरोबरच इतर तालुक्यांतही विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द झाल्याने संताप व्यक्त केला. लवकरच परीक्षा घेऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख