नगरमध्ये मृत्यू 389, तर रुग्णसंख्या 30 हजारांच्या उंबरठ्यावर - The death toll in the city is 389, while the number of patients is on the threshold of 30,000 | Politics Marathi News - Sarkarnama

नगरमध्ये मृत्यू 389, तर रुग्णसंख्या 30 हजारांच्या उंबरठ्यावर

मुरलीधर कराळे
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

नगर शहरात तर कोरोनाचा कहर झाला आहे. सर्व रुग्णालये, कोविड सेंटर फुल झाले असून, बेड शिल्लक नाहीत. त्यामुळे नव्याने वाढलेले रुग्णांचे काय, असा प्रश्न पडत आहे.

नगर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, आतापर्यंत 389 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आतापर्यंत 27 हजार 109 रुग्ण आढळल्याने चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचाच भाग म्हणून राहुरी व जामखेडमध्ये लाॅकडाऊन करण्यात आले असून, इतर तालुक्यांतही लाॅकडाऊनची गरज असल्याची मागणी पुढे येत आहे. 

नगर शहरात तर कोरोनाचा कहर झाला आहे. सर्व रुग्णालये, कोविड सेंटर फुल झाले असून, बेड शिल्लक नाहीत. त्यामुळे नव्याने वाढलेले रुग्णांचे काय, असा प्रश्न पडत आहे. प्रशासनाच्या वेबसाईटवर अनेक खासगी रुग्णालयांचे बेड शिल्लक असल्याचे दिसते. मात्र प्रत्यक्षात रुग्ण गेल्यानंतर बेड शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे.  

जिल्ह्यात आज ५२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार ६७४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.६४ टक्के इतके झाले आहे. काल ६२५ रुग्णांची भर पडली आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ४६ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २२८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २२२ आणि अँटीजेन चाचणीत १७५ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १२०, पाथर्डी ११, नगर ग्रामीण ११, श्रीरामपूर २, कॅंटोन्मेंट १, नेवासा ४, श्रीगोंदा २, पारनेर १, राहुरी २, शेवगाव ४८, कोपरगाव १, जामखेड ५, मिलिटरी हॉस्पिटल १४ आणि इतर जिल्हा ६ अशा रुग्णांचा समावेश आहे. बरे झालेली रुग्ण संख्या आता २२ हजार ६७४ झाली आहे. उपचार सुरू असलेले रूग्णांची संख्या ४ हजार ४६ असून, 389 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख